तंत्रज्ञानापेक्षा माणुसकी मोठी:नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा डॉक्टरांना स्पष्ट संदेश; फडणवीस म्हणाले- प्रत्येकाला 5 किलोमीटर परिसरात आरोग्यसेवा
![]()
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये द्वितीय दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नव्याने पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत मूल्यांवर भर दिला. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी डॉक्टरांमधील करुणा, प्रामाणिकपणा आणि नैतिकता यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. आपल्या भाषणात राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, वैद्यकीय व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून तो मानवतेची सेवा करणारा पवित्र ध्यास आहे. रुग्णांशी संवाद साधताना सहानुभूती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या एका शब्दाने किंवा वागणुकीने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळतो. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरने करुणा आणि संवेदनशीलता जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, त्यांनी तरुण डॉक्टरांना आयुष्यभर शिकत राहण्याचा आणि संशोधनाची वृत्ती जोपासण्याचा सल्ला दिला. जिज्ञासा हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे, असे सांगत त्यांनी नव्या पिढीने वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने ज्ञान वाढवत राहावे, असे आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असला तरी मानवी मूल्यांची जोड तितकीच गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरमधील एम्सने वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि दर्जेदार आरोग्यसेवा यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचेही राष्ट्रपतींनी नमूद केले. ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्यसेवेतील दरी कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाला पाच किलोमीटर परिसरात आरोग्यसेवा या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्यातील आरोग्य क्षेत्रातील सुधारणा आणि भविष्यातील नियोजनाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, सध्या नॉन-कम्युनिकेबल आजारांचे प्रमाण वाढत असून त्यासाठी स्वतंत्र रणनीती तयार केली जात आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्याबरोबरच तृतीय स्तरावरील उपचारही सहज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात 15 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली असून, आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
