आदित्य ठाकरेंनी कार्याध्यक्षपदी निवड होण्याची चर्चा फेटाळली:म्हणाले – प्रस्तुत बातमीत काहीही तथ्य नाही, अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही
![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड होण्यासंबंधीची बातमी जोरकसपणे फेटाळून लावली आहे. प्रस्तुत बातमीत काहीही तथ्य नाही, अशी कोणतीही चर्चा सध्या पक्षात सुरू नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे गटातील नेतृत्व परिवर्तनाविषयी सुरू झालेल्या चर्चेवर पडदा पडला आहे. गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच जून महिन्यात होणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनी या चर्चेची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. पण त्याचवेळी आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे यासंबंधीच्या चर्चेने चांगलाच जोर धरला. बातमीत काहीही तथ्य नाही -आदित्य ठाकरे या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दुपारी एका पोस्टद्वारे आपली कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यासंबंधी पक्षात कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे ठणकावून सांगितले. आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की, मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी, असे आदित्य ठाकरे प्रस्तुत बातमी फेटाळताना म्हणाले.
संजय राऊतांचे कानावर हात संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना या घटनाक्रमाची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले होते. मला मीडियातून माहिती समजली. हे जे निर्णय असतात ते पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतले जातात. उद्धव ठाकरे कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले. आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले असेल, तर स्वागत केले पाहिजे. मी हे मीडियातील माहितीवर बोलत आहे. प्रत्यक्षात असे काहीही ठरले नाही. पुढचे राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे. खासगीत बोलण्याचा अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेत चर्चा होत असते. मुंबई महापालिका व इतर निवडणुकांत आदित्य ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या तरुणांच्या टीमने खूप चांगले काम केले आहे, असे ते म्हणाले. शिवसेना शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर टीका दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मी अनेक वर्षांपासून त्या पक्षाला (ठाकरे गट) पाहत आहे. एखादा निर्णय घेताना सर्वांची सहमती घेतली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. आदित्य ठाकरे यांच्यात पक्ष सांभाळण्याची क्षमता आहे असे मला वाटत नाही. त्यांच्या निवडीमुळे या पक्षाची वाटचाल अस्ताकडे होईल. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राज ठाकरे यांनी विरोधात भूमिका घेतली होती. आता पुन्हा इतिहास घडण्याच्या मार्गावर आहे. या निर्णयामुृळे पक्षाचे भवितव्य चांगले दिसत नाही, असे शिरसाट म्हणाले. केव्हा आहे ठाकरे गटाच्या कार्यकारिणीची बैठक? सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या जून महिन्यात ठाकरे गटाच्या कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर तो सर्वानुमते मंजूर केला जाईल. यावेळी पक्ष संघटनेत अनेक मोठे फेरबदल केले जातील. त्यात निष्ठावंत युवा कार्यकर्तांना अधिक संधी दिली जाईल.
