ही इतिहासाची पुनरावृत्ती:जे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केला, तेच आदित्य करत आहेत- संजय शिरसाट
![]()
शिवसेना ठाकरे गटात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. येत्या जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या नियुक्तीचा ठराव एकमताने मंजूर होण्याची चिन्हे असतानाच, राजकीय वर्तुळात या संभाव्य पदोन्नतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शिवसेनेचा जुना इतिहास काढत बोचरी टीका केली आहे. संजय शिरसाट म्हणाले, आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष नेमणार आहेत, ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. असाच प्रकार बाळासाहेब ठाकरे हयात असताना उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी निवृत्त व्हावे, असे संकेत या कार्याध्यक्ष पदाच्या निवडीतून मिळत आहेत. तुम्ही बसा, मी धुरा सांभाळतो, असे हे चित्र आहे, असे शिरसाट म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न असला, तरी त्यांच्या पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, आता तिथे कोणाचेही चालत नाही. एक कलमी कार्यक्रम होताना दिसत असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यात पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी नाही पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मी 40 वर्षांपासून त्या पक्षाला पाहतो आहे. एखादा निर्णय घेताना सर्वांची सहमती घेतली पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही. आदित्य ठाकरे यांच्यात पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे, असे मला वाटत नाही. या निवडिमूळे पक्षाचे अस्तित्व संपण्याच्या दिशेने तो पक्ष चालला आहे. शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्ष पदाच्या निवडीचा निर्णय घेतला होता, तेव्हा ‘न विचारता प्रस्ताव मांडलाच कसा’, असे विचारत नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव मांडला होता. आता पुन्हा हा इतिहास घडण्याच्या मार्गावर आहे. या निर्णयामुळे पक्षाचे भवितव्य चांगले दिसत नाही. हा पक्ष आता प्रायव्हेट लिमिटेड संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत काय करणार आहेत? कोणाशी भांडणार आहेत आणि कोणाशी बोलणार आहेत? हा पक्ष आता प्रायव्हेट लिमिटेड झाला आहे. तिथे इतरांना अधिकार नाहीत. त्यामुळे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे भांडण आहे, असा निरोप आला, तर त्या भांडणाला पुष्टी मिळेल. पक्षातील सर्वांना विचारले तर कोणीही याला मान्यता द्यायला तयार नाही. मात्र राजासमोर बोलणार कोण, असा प्रश्न आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
