संभाजीनगरमध्ये आजपासून तीन दिवस अवकाळीचा ऑरेंज अलर्ट:ताशी 50-60 किमी वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज
![]()
गेल्या २ दिवसांपासून शहरात सातत्याने तापमान वाढ झाली असताना आता शहरावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहर व परिसराला १५ व १६ एप्रिल रोजी ऑरेंज, तर १७ रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत शहरात अवकाळी पावसासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. अलर्ट असलेल्या तिन्ही दिवशी शहरात, तसेच परिसरामध्ये अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहराचे तापमान रविवारपासून ४० अंशांच्या पार गेले होते, सोमवारी तापमान ४१.२ तर मंगळवारी तापमान ४१.४ अंश होते अधिक तापमान असले तरीही येत्या दोन दिवसांमध्ये या वातावरणात बदल होणार आहे. यामुळे कमाल व किमान तापमानात ४ ते ५ अंश सेल्सियसची घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १८ ते २० एप्रिल रोजी पाऊस नसला तरी शहरात ढगाळ वातावरण राहणार असून, या कालावधीत किमान तापमान २० तर कमाल तापमान ३६ अंश राहणार आहे.
