मुरबाडजवळ सिमेंट मिक्सरवर कार धडकली; 11 प्रवासी ठार:5 प्रवासी क्षमता असूनही 11 जणांना ओम्नीत काेंबले
![]()
कल्याण – अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर कल्याण तालुक्यातील रायते येथील पुलाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी ओम्नी कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक झाली. त्यात ओम्नीचालकासह ११ जण जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास झालेल्या या अपघातातील मृतांत ८ पुरुष, ३ महिलांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील दोन बहिणी, एक भाऊ आहे. २ प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. केवळ ५ प्रवासी क्षमता असलेल्या या कारमध्ये ११ जण कोंबलेले होते. ओम्नीचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (एमएच ०५ जीए ०५२९) मुरबाडच्या दिशेने जात असताना रायते गावाच्या हद्दीत पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरच्या रायते पुलाजवळ सिमेंट मिक्सरला (एमएच १२ टीव्ही ३६६०) धडकली. परिसरातील लोकांनी जखमींना तातडीने गोवेली रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दुर्घटना टाळण्यासाठी अवैध तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांतून प्रवास टाळावा, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून ३१ किमीची प्रवासी वाहतूक मुरबाडच्या रहिवाशांनी सांगितले की, एसटीच्या पुरेशा फेऱ्या नसल्याने कल्याण ते मुरबाड या मार्गावर ओम्नी कारने प्रवासी वाहतूक चालते. सर्वच ओम्नीचालक ५ किंवा ८ प्रवाशांचा परवाना असताना ११ ते १५ प्रवासी कोंबतात. ३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून हा सुमारे ३१ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास होतो. प्रवाशांच्या कोंबाकोंबीकडे वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस आरटीओकडून कानाडोळा केला जातो.
