हिंदुत्ववादी बना:जातीयवाद सोडून सर्व हिंदूंनी एक व्हावे, दिंडोरी येथे हिंदू संमेलनात कालिपुत्र कालिचरण महाराज यांचे आवाहन
![]()
जातीयवाद सोडून देऊन सर्व हिंदूंनी एक व्हावे आणि मतदानाची शक्ती ओळखावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले. शाळांमध्ये धर्म शिकवला जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आपल्या धर्माचे रक्षण करणे हे आपलेच कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन कट्टर हिंदुत्ववादी बना आणि हिंदुस्थानाचे रक्षण करा, असे आवाहन प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु कालिपुत्र कालिचरण महाराज यांनी केले. दिंडोरी येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, प्रतिजेजुरी संस्थानचे गवारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील काळे उपस्थित होते. यावेळी शहरातून रथयात्रा काढत राजे परिवाराच्या वतीने कालिचरण महाराज यांचे औक्षण करण्यात आले. तर जयसिंग राजपुरोहित यांनी स्वागत केले. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांनीही दुष्टांचा संहार करण्यासाठी शस्त्र उचलले होते. त्यामुळे राष्ट्रद्रोही आणि धर्माच्या शत्रूंना कधीही क्षमा करू नये, असे कालिचरण महाराजांनी सांगितले. यावेळी दोन हजार नागरिकांची उपस्थिती होती. हिंदू समाजाचे संघटन हीच काळाची हाक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील काळे यांनी संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख करत समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. समाजातील आत्मकेंद्रित वृत्ती आणि आत्मविस्मृती दूर करण्यासाठी ‘ हिंदू संमेलन’ हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. हिंदू समाजातील संघटन वाढवून आपल्याला मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचे आहे. सध्या समाजात सामूहिक संघटनेचा जो अभाव दिसतो, तो दूर करून एकजूट होणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. आईकडून मिळणारे संस्कार मोलाचे धावपळीच्या युगात युवकांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. ज्या युवकांच्या मनात देशाविषयी प्रेम आणि आदर असेल तीच पिढी उद्याचा समर्थ भारत घडवेल. त्यासाठी कुटुंबातून, विशेषतः आईकडून मिळणारे संस्कार मोलाचे ठरतात, असे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले.
