मराठा साम्राज्याचा नकाशा पुनर्स्थापित करण्याची मागणी:युवासेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन
![]()
इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत तो तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी युवा सेना, कॉलेज कक्ष मराठवाड्याचे पदाधिकारी निखिल काकडे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. रविवारी (दि. १२) संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांची भेट घेऊन काकडे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. मराठा साम्राज्य हे भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडणीत मोलाचे योगदान देणारे साम्राज्य असून, अशा महत्त्वपूर्ण घटकाचा नकाशा वगळल्याने विद्यार्थ्यांची इतिहासाविषयीची समज अपूर्ण राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात पेशवे दप्तरातील कागदपत्रे, राजपूताना गॅझेटमधील उल्लेख, अहमदनामा करार तसेच ब्रिटिशकालीन नकाशे असे विविध ऐतिहासिक पुरावेही सादर करण्यात आले. त्यामुळे या निर्णयाचा गांभीर्याने विचार करून इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी करण्यात आली.
