12 वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी:अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांना मिळाले यश

0
f809094b-3591-4f3a-936f-57a64f33b033_1776097843612.jpg




अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) १२ वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडातील अत्यंत गुंतागुंतीची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मुलीला नवजीवन मिळाले असून, तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. गाठीमुळे या बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते. त्यामुळे तिला अन्न गिळण्यास, श्वास घेण्यास आणि चालण्यासही खूप त्रास होत होता. गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांच्या चमूने घेतला. तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर सोनोग्राफी व सीटी स्कॅनद्वारे तिच्या स्वादुपिंडात ‘स्युडोसिस्ट ऑफ पॅनक्रियाज’ नावाची मोठी गाठ असल्याचे निदान झाले. या गाठीमध्ये सुमारे दोन लिटर द्रव साचला होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या सल्ल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. नरोटे आणि डॉ. मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडियाट्रिक सर्जन डॉ. उषा गजभिये, बधिरीकरण तज्ञ डॉ. संजय महातपुरे, डॉ. ऋषिकेश नागलकर, डॉ. नितीन बरडिया, डॉ. नम्रता भस्मे, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, अधीसेविका चंदा खोडके, इन्चार्ज सिस्टर विद्या चुडे, श्रद्धा पटोरकर, ज्योती गोंडसे आदींनी या शस्त्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. पोटाचा पुढील व मागील भाग कापून पुन्हा जोडण्याची ही अत्यंत जटिल प्रक्रिया अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा खर्च आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे विनामूल्य करण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनामुळे गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. सध्या रुग्ण बालिका पूर्णपणे बरी असून तिला लवकरच रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed