'माझा भाऊ इथं आयजी, त्याला धर्मसंकटात नाही टाकायचं':विश्वास नांगरे पाटलांनी दिला आशाताईंच्या आठवणींना उजाळा
![]()
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न सचिन तेंडुलकरने अंत्यदर्शनावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचे हृदयस्पर्शी आठवणींचे पदर उलगडत आपला शोक व्यक्त केला आहे. तसेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आशाताईंसोबतचा एक किस्सा सांगितला आहे. अलौकिक, अवलिया आशा ताई! असे म्हणत विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिले की, नुकतीच सचिननी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. उमंग या पोलीस कल्याण कार्यक्रमात आम्ही सचिनचा सत्कार करायचे योजिलें होते. तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तीच्या हातून सचिनचा सन्मान व्हायला हवा होता. त्यावेळी पहिल्यांदा आशाताईंशी बोललो. निमंत्रण दिले. त्यांनीही आढेवेढे न घेता स्वीकारले. कार्यक्रम नक्षत्रासारखा देखणा झाला. या प्रासंगिक निमित्ताने ताईंशी माझा ऋणानुबंध जमला. संभाजीनगरला मी आयजी होतो त्यावेळी आशाताईंचा शो होता. दहा वाजले. मी सहकुटुंब हजर होतो. शो रंगात आला होता. प्रेक्षक बेभान होऊन ‘दम मारो दम’ वर नाचत होते. वन्स मोर चा नादघोष बंद होईना. त्यावेळी आशा ताई माईक वरून बोलल्या माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही आणि कार्यक्रम डॉट टाइम वर बंद केला. पोटभर चिकन मटण फिश खाऊ घालायच्या.. काहीतरी कारणाने आशाताईंचा फोन यायचा अधून मधून ! भेटही व्हायची! महिन्याभरापूर्वी फोन करून मला लोअर परेलला घरी बोलावले. एका अबलेच्या गाऱ्हाण्यासाठी! परित्यक्ता होती पण सोडून गेलेला नवरा दारू पिऊन येऊन मारत होता. बिचारीच्या नावावर एक खोली होती. ती लाटण्यासाठी तिचा खून करेल अशी तिला भीती वाटत होती. मला तर पोलिसांनी ऍक्शन घ्यावी हे सांगितलेच. पण एका प्रथितयश महिला वकीलाला फोन करून तिची डोमेस्टिक व्हायलंस ची केस घ्यायला लावली. जी काही फी आहे ती मी देईन असे त्या वकील बाईंना सांगितले. ज्या ज्या वेळी घरी बोलवायच्या, पोटभर चिकन मटण फिश खाऊ घालायच्या. अशा कशा आशाताई मला जेऊ न घालताच गेल्या शेवटचा फोन गेल्या आठवड्यात आला. आंध्रप्रदेशमधील एका गरीब महिला त्यांच्या घरी काम करते. तिच्या घरी घरफोडी झाली होती. होते न्हवते ते सगळे चोरीला गेले होते. मी माझ्या बॅचमेटला फोन केला. त्याने सूत्रे हलवली. चोर सापडला आणि सगळा मुद्देमालही. आशाताई सॉलिड खुश झाल्या. मला हरखून फोन केला. पुन्हा जेवायचे आमंत्रण दिले. मी त्यांच्या सहवासासाठी आणि चवदार मेजवानीसाठी आसुसलेला असायचो . पण अशा कशा आशाताई मला जेऊ न घालताच भुर्रर्र उडून गेल्या. आशाताईंच्या सुरांच्या मैफिलीत भिजून चिंब होण्याची मजा वेगळीच त्यांची गाणी ही अशीच झटका देणारी. आर्त भावना जागवणारी, प्रेमात पाडणारी, विरह, वेदना,प्रणय, सौंदर्य, साफल्य सगळ्या भावांचा अविष्कार घडविणारी! प्रचंड वैविध्याच्या छटा आपल्या हरहुन्नरी, ऊर्जादायी, विजिगिषु आवाजातून आशाताई श्रावकाच्या हृदयात, मनात आणि रोमारोमांत भिनवायच्या. त्यांचा सुरेल आवाज हा नखशिखांत रोमांच उभे करायचा. त्यांच्या सुरांच्या मैफिलीत भिजून चिंब होण्याची मजा वेगळीच! स्वरविश्वाचं आकाश आता पुरत रीत झालं स्वतःला एवढं सुंदर जपणाऱ्या, सर्वांची सदोदित काळजी घेणाऱ्या, इतरांच्या जीवनात मोगरा फुलवणाऱ्या, स्वरांचा अगाध बेबंद धबधबा असणाऱ्या, चिरतरुण आशाताई नावाप्रमाणेच प्रचंड आशावादी होत्या. लतादीदीनंतर मोकळं झालेलं स्वरविश्वाचं आकाश आता पुरत रीत झालं आहे. ती अवीट गोडी, ते चंचल तारुण्य, ते थिरकणार डौलदार पाऊल, ती अप्रतिम अदा कुठे कशी शोधून सापडणार ! ताई तुम्ही अनंतात विलीन झाल्या आहात ! त्या अनंताला किती आनंद झाला असेल. तुम्हाला आणि तुमच्या सर्वांगसुंदर व्यक्तित्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
