Pune RTGS Cyber Fraud: Bank Loses ₹8.5 Lakhs
![]()
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका बँकेची सायबर चोरट्यांनी साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरटीजीएस (RTGS) सुविधेचा वापर करून बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याला तातडीने पैसे पाठवण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली.
.
या प्रकरणी एका बँक कर्मचारी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात तक्रारदार महिला कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी ‘आरटीजीएसद्वारे बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले होते, परंतु ती रक्कम अजून जमा झाली नाही,’ असे सांगून फसवणूक केली. चोरट्यांनी बँकेतील एका खातेदाराचा क्रमांक आरटीजीएससाठी दिला होता.
त्यानंतर, सायबर चोरट्यांच्या खात्यात तातडीने साडेआठ लाख रुपयांची रक्कम पाठवण्यात आली. मात्र, ज्या खात्यातून ही रक्कम जमा झाली होती, त्या खातेदाराने बँकेशी संपर्क साधून ‘आम्ही आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगितले नव्हते, तर आमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम कशी हस्तांतरित झाली?’ असा प्रश्न विचारला. चौकशीअंती हा फसवणुकीचा प्रकार समोर आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर तांत्रिक ताबा (हॅक) मिळवून त्यांच्या बँक खात्यातून ७ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत कोथरूड भागात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला होता. चोरट्यांनी ज्येष्ठाच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. ती लिंक उघडताच चोरट्यांनी मोबाइल क्रमांक हॅक केला आणि बँक खात्यातून रक्कम काढून घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. मोबाइल क्रमांक हॅक करून बँक खात्यातून रोकड चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.
