अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या:शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सटाणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने
![]()
बागलाण तालुक्यातील ५० हून अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) संपर्क नेते जयंत दिंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १०) तहसील कार्यालयावर धडक देत निदर्शने करण्यात आली. तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कांद्याला किमान २५०० ते ३००० रुपये भाव द्यावा आणि यापूर्वी विक्री केलेल्या कांद्यावर कोणतेही निकष न लावता ५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करावे, असे निवेदनात म्हटले आहे. सध्या ७/१२ व इतर कागदपत्रे जमा करताना सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, जेणेकरून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून मागण्या वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी ग्रामीण जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख रवींद्र सोनवणे, मुन्ना सोनवणे, शरद शेवाळे, राजू खानकरी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
