प्रगतिशील शेतकरी:पाण्याचे बजेट, मार्केटिंगद्वारे जिरायत शेतीतून 96 लाखांचे उत्पन्न; राहात्याचे शेतकरी सुभाष गडगेंचा आदर्श पॅटर्न
![]()
राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई हे गाव कधीकाळी दुष्काळाच्या छायेत होते. वार्षिक जेमतेम 150-200 मिमी पाऊस. अशा जिरायत भागात जिथे 20 एकरातून 5 पोती बाजरी निघणे कठीण होते, तिथे सुभाष विठ्ठल गडगे हे प्रयोगशील शेतकरी आज 96 लाखांचे उत्पन्न घेत आहेत. एकेकाळी कुटुंबासाठी ‘ड्रायव्हर’ म्हणून चाक फिरवणाऱ्या या हातांनी आज आधुनिक शेतीचे स्टिअरिंग इतके घट्ट पकडले आहे की त्यांच्या शेतीचा पॅटर्न पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी येत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गडगे यांनी सुरुवातीला वाहनचालक म्हणून काम केले. या प्रवासात विविध राज्यांतील शेती जवळून पाहता आली. तेथूनच आधुनिक शेतीची प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या मातीत प्रयोग करण्याचे ठरवले. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून त्यांनी 1 कोटी 56 लाख लिटर क्षमतेचे विशाल शेततळे उभारले आणि तिथूनच त्यांच्या यशाचा ‘हायवे’ सुरू झाला. गडगे यांनी पारंपरिक शेती न करता तंत्रज्ञानाची जोड दिली. “थेंबानं पाणी, चमच्याने खत” हे सूत्र त्यांनी अमलात आणले. ‘फुले जल अॅप’चा वापर करून मातीतील ओलावा मोजणे आणि त्यानुसार खत व्यवस्थापन केल्याने पिकांचा दर्जा कमालीचा सुधारला. आज त्यांच्या 6 एकर द्राक्षबागेतील माल युरोप आणि रशियाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करत आहे. उत्पादन घेऊन न थांबता गडगे यांनी स्वतःची मार्केटिंग साखळी तयार केली. व्यापाऱ्यांशी संपर्क आणि रोख व्यवहारांवर भर दिल्याने मध्यस्थांची साखळी तुटली आणि नफ्यात वाढ झाली आहे. असे आहे गडगेंच्या उत्पन्नाचे गणित गडगे यांच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित थक्क करणारे आहे. त्यांनी 30 गुंठ्यांच्या पॉलिहाऊसमध्ये लाल आणि पिवळ्या ढोबळ्या मिरचीची लागवड केली असून त्यातून त्यांना दरवर्षी सुमारे 36 लाखांचे उत्पन्न मिळते. तसेच, 6 एकरांवरील द्राक्षबागेतून सुपर सोनाका आणि क्रिमसन वाणाच्या युरोप-रशियातील निर्यातीद्वारे 60 लाख रुपयांची कमाई होते. यासोबतच 11 एकरांवर डाळिंब, ऊस आणि मका यांसारख्या पिकांचे यशस्वी नियोजन त्यांनी केले आहे.
