मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच:पोलिसांच्या चौकशीदरम्यान वक्तव्य; अशोक खरातचा मानसिक तोल ढासळला
![]()
नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दररोज तासन्तास चालणाऱ्या चौकशीमुळे त्याच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर चौकशीदरम्यान त्याने, मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे, असे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक खरातला अटक झाल्यापासून त्याच्याविरोधात एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. एका प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोच दुसऱ्या प्रकरणात त्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या एसआयटीकडून त्याची दररोज आठ ते दहा तास चौकशी होत असून, या प्रक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती ढासळल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात सुमारे 15 गुन्हे नोंदवण्यात आले असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्याच्या तपासावर भर दिला जात आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. अशोक खरातने स्वतःला दैवी शक्ती असल्याचे सांगत अनेक महिलांना फसवले, तसेच धार्मिक विधीच्या नावाखाली त्यांच्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अनेक महिलांनी त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून, या प्रकरणांचा तपास सुरू आहे. मात्र, या गंभीर आरोपांची कबुली त्याने अद्याप दिलेली नाही. याशिवाय आर्थिक गैरव्यवहाराचेही धागेदोरे तपासात समोर येत आहेत. दरम्यान, एसआयटीने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावरील तीन बँक खाती गोठवली आहेत. नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरमधील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. संशयास्पद व्यवहारांमुळे खरातच्या मालमत्तांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्ह्यांचा तपासही अधिक गतीने सुरू आहे. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अशोक खरात आपल्या श्रीमंत भक्तांना सरकारी यंत्रणांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे. आयकर विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई होईल, अशी भीती दाखवून तो भक्तांना पैसे त्याच्याकडे ठेवण्यास किंवा गुंतवणूक करण्यास भाग पाडत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे अनेक जण आर्थिक फसवणुकीचे बळी ठरल्याचा संशय आहे. खरात अधिकच कोंडीत सापडला एकूणच, अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, त्याच्याविरोधातील पुरावे वाढत आहेत. एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासामुळे त्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मानसिक तणाव आणि वाढते गुन्हे यामुळे खरात अधिकच कोंडीत सापडला आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
