पुणे विद्यापीठात महात्मा फुले जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान:सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण महत्त्वाचे – ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे
![]()
ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हाच मुख्य मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित करत समाजपरिवर्तनासाठी फुले-आंबेडकर विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संत ज्ञानेश्वर सभागृहात ‘महात्मा फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डांगळे प्रमुख वक्ते होते. फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि महिलांना सशक्त करण्याचे कार्य केले. आजही समाजातील असमानता आणि अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात, असे डांगळे यांनी नमूद केले. यावेळी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी आणि प्रमुख पाहुणे अर्जुन डांगळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, प्रा. डॉ. संजय तांबट, प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. डॉ. गणेश भामे, डॉ. अजय ठुबे, अध्यासनप्रमुख, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख आदी मान्यवरांनीही पुष्पांजली अर्पण केली. डांगळे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केवळ धोरणे पुरेशी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या विचारांमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी घडवणारे प्रभावी माध्यम आहे, असेही ते म्हणाले. तरुण पिढीने फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून अन्यायाविरुद्ध सजग भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी फुले यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आपल्या आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीमुळेच खरी प्रगती साध्य होऊ शकते, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
