वेरूळ घृष्णेश्वर विकास कामांचा जिल्हाधिकारी गौडांनी घेतला आढावा:कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
![]()
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नुकताच आढावा घेतला. भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दर्शनबारी, रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासह विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा यात समावेश होता. या बैठकीला पोलीस उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहायक जिल्हाधिकारी अंकिता ताकभाते, कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उप वनसंरक्षक सुवर्णा माने, केंद्रीय पुरातत्व विभागाचे डॉ. शिवकुमार भगत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, कार्यकारी अभियंता एस.जी. केंद्रे, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता अनघा पुराणिक, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक चंद्रकांत सेवक आणि घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव योगेश टोपरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील दर्शनबारी, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि भक्त निवासाची कामे दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर वाढीव निधी न देता कारवाई करण्याचेही सूचित करण्यात आले. नवीन रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज यंत्रणांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही गौडा यांनी दिले. घृष्णेश्वर मंदिर परिसराची पाहणी करून, पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या संरक्षित वास्तू आणि परिसराच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच, वरिष्ठ पातळीवरून आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पुरातत्व विभागाने सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सेवा-सुविधा पुरवण्यासाठी विकास आराखड्यातील कामे निविदा, कार्यादेश, तांत्रिक मान्यता आणि निधीच्या उपलब्धतेसह तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान कार्यान्वित करण्यासाठी पाणीपुरवठा आणि महावितरण विभागाला निर्देश देण्यात आले. वन विभागांतर्गत गिरी परिक्रमा आणि इतर आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करून कामकाज पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. पर्यटक आणि भाविकांसाठी पाणी, पथदिवे, दर्शनबारीची सुविधा, वाहतुकीची पर्यायी व्यवस्था, वाहनतळ, बस स्टँड आणि निवास व्यवस्था यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना देण्यात आले. बाहेरून येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी रस्त्यांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत दिशादर्शक फलक लावण्याचे सूचित करण्यात आले. नवीन रस्ते मार्गांमध्ये पर्यायी बस वाहनतळ समाविष्ट करण्याबरोबरच अतिक्रमण झालेल्या नागरिकांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे कामही करण्याबाबत सूचना देण्यात आली.
