नवऱ्याने शिक्षिका पत्नीला सुपारी देऊन संपवले:गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांचे कथित अभय; CBI चौकशीसाठी केंद्रीय मंत्र्याचे CM ला पत्र
![]()
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एका शिक्षिकेच्या हत्येच्या सीबीआय चौकशीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या शिक्षिकेची तिच्याच नवऱ्याने सुपारी देऊन हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह इतर दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पण आता चक्क केंद्रीय मंत्र्यानेच या घटनेतील इतर आरोपींना पोलिस अभय देत असल्याचा आरोप करत थेट सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील वृषाली गावंडे या जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका होत्या. त्या गत 2 मार्च रोजी पिंपळगाव काळे येथील आपल्या शाळेत जात असताना त्यांना एका चारचाकी वाहनाने उडवले. त्यात त्यांचे जागीच निधन झाले. सुरुवातीला हा प्रकार अपघाताचा वाटला होता. पण नंतर झालेल्या चौकशीत वृषाली यांची त्यांच्याच पतीने सुपारी देऊन हत्या केल्याची बाब निष्पन्न झाली होती. त्यानुसार, पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती, त्याचा मित्र व वाहनचालक अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिस आरोपींना अभय देत आहेत का? पण या गुन्ह्यात सहभागी असणारे वृषालीच्या नवऱ्याचे इतर नातलग अद्यापही मोकाट आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिस या आरोपींना अभय देत आहेत का? असा सवाल केला आहे. त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली. प्रस्तुत प्रकरणात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, असेही ते आपल्या पत्रात म्हणालेत. स्वतः केंद्रीय मंत्र्यानेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केल्यामुळे नागरीक पोलिसांवर रोष व्यक्त करत आहेत. नेमकी काय घडली होती घटना? वृषाली गावंडे यांच्या दुचाकीला 2 मार्च रोजी सकाळी 6.30 वा. पिंपळगाव काळे गावाकडे जाताना एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा वृषाली यांच्या मृतदेहाशेजारी त्यांचा पती प्रकाश गावंडे रडत बसला होता. त्यावेळी पोलिसांना हा अपघातच वाटला होता. पण नंतर वृषाली यांच्या माहेरच्या लोकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी तत्काळ घातपाताच्या अंगाने या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच काही फोन कॉलचे रेकॉर्डही तपासले. त्यानंतर त्यांनी स्कूटीला धडक देणाऱ्या चारचाकीचा चालक मंगेश सूर्यवंशी नामक व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवताच त्याने वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व मध्यस्थ मंगेश चहुळकर या दोघांनी आपल्याला वृषाली यांना धडक देण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी या तिघांच्याही मुसक्या आवळल्या.
