वातावरणातील अनिश्चित बदल आजारपणास कारणीभूत; किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

डेंग्यू, मलेरिया आणि अन्य उष्णकटिबंधीय संसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान व उपचार आवश्यक; यशोदा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. दुर्गेश साताळकर यांचा सल्ला

नांदेड / प्रतिनिधी :

वातावरणातील अनिश्चित बदल, अवकाळी पाऊस, वादळी वारे, वाढती उष्णता आणि तापमानातील चढ-उतार यांमुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे. विशेषतः डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस यांसारखे उष्णकटिबंधीय संसर्गजन्य आजार तसेच न्यूमोनियासह होणारे विषाणूजन्य ताप आणि त्यानंतर उद्भवणारे जिवाणूजन्य संसर्ग याबाबत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजाराचे स्वरूप गंभीर होऊ शकते. त्यामुळे वेळीच निदान आणि योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा सल्ला सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार व अतिदक्षता उपचारतज्ज्ञ डॉ. दुर्गेश साताळकर यांनी दिला.

नांदेड येथील नमस्कार चौक परिसरातील हॉटेल आस्वाद येथे सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. साताळकर म्हणाले की, मराठवाड्यासह शेजारील राज्यांमध्येही डेंग्यू, मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. अशा आजारांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक रक्ततपासण्या करून आजाराचे अचूक निदान करणे आणि त्यानुसार उपचार सुरू करणे गरजेचे आहे. तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, सतत उलट्या, हिरड्यांतून रक्त येणे आणि असह्य थकवा ही डेंग्यूच्या गंभीर स्वरूपाची संभाव्य धोक्याची लक्षणे आहेत. विशेष म्हणजे डेंग्यूमध्ये ताप उतरू लागल्यानंतरही रुग्णाच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे ताप कमी झाला म्हणजे आजार पूर्णपणे बरा झाला, असे समजू नये. कोणतीही संशयास्पद लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अतिगंभीर रुग्णांसाठी ईसीएमओ तंत्रज्ञान ठरते जीवनरक्षक

Viral / bacterial न्यूमोनियामुळे फुफ्फुसांचे कार्य गंभीररीत्या बाधित होऊन रुग्णाला श्वसनाचा तीव्र त्रास निर्माण झाल्यास कृत्रिम श्वसनयंत्रणेची (व्हेंटिलेटर) आवश्यकता भासू शकते. मात्र, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असूनही रुग्णाच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्यास योग्य वेळी ईसीएमओ (एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) हे प्रगत जीवनरक्षक तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शरीराला आवश्यक प्राणवायू पुरविण्यास आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्यास मदत होते. योग्य रुग्णाची निवड आणि योग्य वेळी उपचार सुरू केल्यास अतिगंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्याची संधी निर्माण होऊ शकते.

सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचारव्यवस्था, प्रगत जीवनरक्षक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या माध्यमातून अतिगंभीर रुग्णांवर उपचार केले जातात. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागांतूनही रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येत असल्याची माहिती डॉ. साताळकर यांनी दिली.

डॉ. दुर्गेश साताळकर यांचा परिचय ..

डॉ. दुर्गेश जे. साताळकर हे सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सल्लागार व अतिदक्षता उपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून, तर भूलशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. अतिदक्षता उपचारशास्त्रातील आयडीसीसीएम, आयएफसीसीएम तसेच युरोपियन डिप्लोमा इन इंटेन्सिव्ह केअर (ईडीआयसी) यांसारख्या विशेष पात्रताही त्यांनी संपादन केल्या आहेत. मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित अतिगंभीर आजारांचे उपचार, गंभीर दुखापती, कृत्रिम श्वसनव्यवस्थापन तसेच तीव्र श्वसनविकार (एआरडीएस) यांसारख्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितींचे व्यवस्थापन करण्याचा त्यांना विशेष अनुभव आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

You missed

Home
Account
Cart
Search