धार्मिक:रामनाम मानवी जीवाला विसावा देणारे ठिकाण, वटवृक्ष मंदिरात पुण्यतिथीच्या धर्मसंकीर्तन महोत्सवात गाडगीळ यांचे निरुपण
![]()
अक्कलकोट मानवी जिवाला विसावा देणारं ठिकाण म्हणजे रामनाम असल्याचे निरुपण कल्याण येथील हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी केले. ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेच्या पूर्व रंगात पाचवे पुष्प समर्थ रामदास स्वामींच्या अभंगावर गुंफत निरुपण करताना बोलत होते. कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार हभप गणेश बुवा गाडगीळ व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या कीर्तन सेवेत पुढे निरुपण करताना हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी मनुष्याने आदर्श जीवन सर्वार्थाने कसे जगावे हे शिकवणारे चरित्र म्हणजे राम. विष प्राशन केल्यावर शंकराचा दाह सुद्धा राम नामाने शांत झाला म्हणून आधी तो गावा सगुण उपासना मग त्याचे ध्यान म्हणजेच सगुणाकडून निर्गुणाकडे मार्गक्रमण आणि समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे राम सर्व काम पुरवतो, तो राम असे निरूपण करुन प्रत्येकाने रामनाम घेण्यास आपल्या जीवनात आवर्जून स्थान द्यावे असे निरुपण केले. या कीर्तन सेवेत त्यांना तबल्यावर कोल्हापूरचे तबलावादक डॉ. सचिन कचोटे, संवादिनीवर अक्कलकोटचे प्रा.मयूर स्वामी यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वला सरदेशमुख, संपतराव शिंदे, स्वामीनाथ लोणारी, संजय पाठक यांच्यासह सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. श्री गणेशाच्या आरतीने सेवेची सांगता पुढे कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात कैवल्य पद सुद्धा प्राप्त करून देईल असे ज्यांनी आयुष्यात आधी केले मग सांगितले असे गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज. ‘ज्याचा लवकिक काही नसे ज्याचे घरी पण कुबेर लोळे दारी तो वाटे तेची करी ऐसां नाही पहिला’ या श्लोकाचा परिचय देत ज्या राम नामात शक्ती आहे, त्या रामाला शरण जा. तो सर्व इच्छा पूर्ण करतो त्याच्यासाठी राममंदिर स्थापन केले हा कथा भाग घेतला. आजही राम नाम जिथे आपल्या मनाच्या पटलावर गोंदवले जाते ते गोंदवलेकर महाराज सगळ्यांना नाम घेण्याचा आग्रह करतात. तसेच स्वामीचे प्रचलीत वाक्य ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ याचीही विश्लेषण हभप गाडगीळ बुवा यांनी करीत श्री गणेशाच्या आरतीने व श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणाने या नारदीय कीर्तन सेवेची सांगता करण्यात आली.
