आदिनाथ कारखान्याचा ई-लिलाव; एनसीडीसीकडून 22 मे रोजी प्रक्रिया:कारखान्याकडे एनसीडीसीचे 85 कोटी 12 लाख 75 हजार 464 रुपये कर्ज थकीत
![]()
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत मोठी घडामोड समोर आली असून, राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून ‘सरफेसी’ कायद्याअंतर्गत ई-लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून दि. २२ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ई-लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रसिद्ध झालेल्या नोटिसनुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे एनसीडीसीचे तब्बल ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये इतके कर्ज थकीत आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावासाठी काढण्यात आली आहे. या लिलावामध्ये कारखान्याच्या ९५ हेक्टर ७४ आर क्षेत्रातील जमीन, त्यावरील सध्याच्या इमारती तसेच पुढे उभारण्यात येणाऱ्या स्थावर मालमत्तेचाही समावेश करण्यात आला. याशिवाय साखर कारखाना, डिस्टिलरी, को-जनरेशन वीज प्रकल्प, साखर मिल आणि संबंधित यंत्रसामग्री देखील लिलाव प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली. सध्या आदिनाथ कारखाना करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यात असल्याने या नोटीसीमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. कारखान्याचे भवितव्य काय होणार, याकडे आता शेतकरी, सभासद आणि कामगारांचे लक्ष लागले असून, अनेक शेतकरी व सभासदांनी कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ^आदिनाथ कारखान्याबाबत आलेली ई-लिलाव नोटीस ही बँकेची नियमित प्रक्रिया असून प्रत्यक्ष लिलाव होणार नाही. यापूर्वीही अशाच प्रकारची नोटीस आली होती. यावेळीही चेअरमन, संचालक मंडळ व प्रशासनाच्या संमतीने संबंधित नोटीसला योग्य उत्तर दिले जाणार असून सदर लिलाव प्रक्रिया स्थगित केली जाईल. सर्जेराव राऊत, प्रभारी कार्यकारी संचालक, (आदिनाथ सह. कारखाना.) ^स्व. कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी आदिनाथ कारखाना सुरू होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यांच्याच पुत्रांच्या अध्यक्षतेत कारखान्यावर दोनदा लिलावाची नोटीस येणे दुर्दैवी आहे. निवडणुकीत सोन्याचा धूर काढण्याची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात साधा बगॅसचाही धूर निघाला नाही. नारायण पाटील हे निष्क्रिय चेअरमन ठरले आहेत. सुभाष गुळवे, उपाध्यक्ष, बारामती ॲग्रो कारखाना.
