नाशिकरोड कारागृहात अधिकाऱ्यांची आरोपीसोबतच 'दारू पार्टी'!:तीन तुरुंग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
![]()
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर तसेच तेथील प्रशासकीय शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. घटना अशी आहे की, एका गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्यातीळ संशयित आरोपीसोबत कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवत 3 तुरुंग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र कायद्याचा बालेकिल्ला होण्याऐवजी दारूचा खंबा झालाय, अशी टीका त्यांनी केली आहे. या गंभीर प्रकाराबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारी निवसस्थानाच्या बाहेरील परिसरात तीन जबाबदार अधिकारी एका संशयित आरोपीसोबत दारू पार्टी करत असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, गंभीर स्वरूपातील आरोप असलेल्या आरोपीसोबत पोलिसांचे असे लागेबंध असल्याचे पाहून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओच्या आधारे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर तपास करून आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. यात हिरालाल भांमरे (तुरुंग अधिकारी), जगदीश ढुमणे (तुरुंग अधिकारी), अशोक मलवाड (तुरुंग अधिकारी) या तिन्ही अधिकाऱ्यांवर कर्तव्यवर कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हे तिन्ही अधिकारी 2014 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कार्यरत आहेत. प्रशासनाने या तिघांनाही नोटीस बजावली असून 7 दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत. तो आरोपी कोण आहे? ज्या संशयित आरोपीसोबत तीन तुरुंग अधिकारी पार्टी करत होते, त्या आरोपीचे नाव गौरव मिश्रा असे आहे. गौरव मिश्रावर 2024 मध्ये नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर 21 नोव्हेंबर 2024 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली होती. आता हा व्हायरल व्हिडिओ कधीचा आहे, हे अद्याप समोर समजलेले नाही. तरी या प्रकरणामुळे आता या तिन्ही तुरुंग अधिकाऱ्यांवर निलंबनाची किंवा अन्य कोणती कडक कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. महाराष्ट्र कायद्याचा बालेकिल्ला होण्याऐवजी दारूचा खंबा झालाय- विजय वडेट्टीवार कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी ट्विट करत भाष्य केले आहे. ते म्हणाले, देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र कायद्याचा बालेकिल्ला होण्याऐवजी दारूचा खंबा झालाय हीच खरी शोकांतिका आणि वस्तुस्थिती आहे. पोलीस आणि आरोपीच जर एकत्र दारू पीत असतील तर देवाभाऊ आता तरी मान्य करा की तुम्हाला कोणच घाबरत नाही. जनता जनार्दन सर्वकाही बघत आहे देवाभाऊ..तुमच्या नेतृत्वात आरोपी सुरक्षित आहेत आणि सर्वसामान्य जनता रोज जीव मुठीत धरून जगत आहे. देवाभाऊ, लक्षात ठेवा, “देवाच्या काठीला आवाज नसतो!”, असे त्यांनी म्हटले आहे.
