IPL 2026 | मिलरची ती एक चूक नडली! दिल्लीने जिंकलेला सामना गमावला; गुजरातचा थरारक विजय
IPL 2026 | आयपीएलच्या (Indian Premier League) 2026 हंगामातील एका अत्यंत रोमांचक सामन्यात (Gujarat Titans) संघाने (Delhi Capitals) वर अवघ्या 1 धावेने नाट्यमय विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत दिल्ली विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती, मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या चुकीमुळे सामना हातातून निसटला आणि गुजरातने हा सामना आपल्या खात्यात जमा केला.
सामन्याच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) ला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातच्या फलंदाजांनी या संधीचा चांगला फायदा घेत 20 षटकांत 4 विकेट गमावत 210 धावांचा मोठा डोंगर उभा केला. संघाच्या धावसंख्येत तीन फलंदाजांनी अर्धशतक ठोकत महत्त्वाचे योगदान दिले.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याने सर्वाधिक 70 धावा करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने 55 धावांची उपयुक्त खेळी साकारली, तर विकेटकीपर फलंदाज Jos Buttler याने 52 धावांची झंझावाती इनिंग खेळली. दिल्लीकडून मुकेश कुमार (Mukesh Kumar) याने दोन विकेट्स घेत गुजरातला काही प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला.
IPL 2026 | राहुलची झुंजार खेळी, तरीही दिल्लीचा पराभव :
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनीही जोरदार संघर्ष केला. विशेषतः KL राहुल याने शानदार फलंदाजी करत 52 चेंडूत 92 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या या डावात 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तसेच Pathum Nissanka याने 24 चेंडूत 41 धावा करत संघाला भक्कम साथ दिली. दरम्यान डेविड मिलर दुखापतीमुळे काही काळासाठी मैदानाबाहेर गेला होता, परंतु संघाला गरज असताना तो पुन्हा फलंदाजीसाठी आला आणि 20 चेंडूत 41 धावा करत विजयाच्या आशा निर्माण केल्या.
सामना शेवटच्या षटकात अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला. दिल्लीला अंतिम षटकात 13 धावांची गरज होती आणि शेवटच्या दोन चेंडूंवर फक्त 2 धावा हव्या होत्या. त्या वेळी मिलर स्ट्राईकवर होता आणिकुलदीप यादव (Kuldeep Yadav) त्याच्या सोबत होता. मात्र प्रसिद्ध क्रिष्णा (Prasidh Krishna) याने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर मिलरने एक धाव घेण्यास नकार दिला, ज्यामुळे सामना शेवटच्या चेंडूवर गेला. अंतिम चेंडूवर मिलर धावा काढण्यात अपयशी ठरला आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादवला Jos Buttler याने चपळाईने रनआउट केले. परिणामी गुजरातने अवघ्या 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला.
