महावितरणच्या अभियंत्याला लाच घेताना अटक:धारणीत एसीबीची कारवाई; 70 हजार वेतन असूनही 4 हजारांची लाच मागितली
![]()
धारणी येथे महावितरणच्या एका सहायक अभियंत्याला ४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. सुमारे ७० हजार रुपये मासिक वेतन असूनही त्याने सौर ऊर्जा कनेक्शनसाठी लाच मागितली होती. ही कारवाई बुधवारी सायंकाळी धारणी येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली. सुशांत हरिदास बावनगडे (वय ४५, रा. धारणी) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे सोलर पॅनल बसवण्याचा व्यवसाय करतात. ग्राहकांसाठी सोलर मीटर रिलीज ऑर्डर मिळवण्यासाठी त्यांना महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तक्रारदारांनी मार्च महिन्यात चार ग्राहकांच्या घरी सोलर पॅनल बसवले होते. या चारही ग्राहकांच्या सोलर मीटर रिलीज ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. ७ एप्रिल रोजी ते या संदर्भात चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी सहायक अभियंता सुशांत बावनगडे यांची भेट घेतली. बावनगडे यांनी तक्रारदाराला चार ग्राहकांच्या सोलर मीटर रिलीज ऑर्डर देण्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितली. या मागणीनंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, बावनगडे यांनी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आज सापळा रचण्यात आला. बावनगडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक योगिता ठाकरे, चित्रा मेसरे, शैलेश कडू, आशिष जांभोळे आणि सतीश किटुकले यांच्या पथकाने केली. दरम्यान, अमरावती शहरातील साईनगर भागातही काही घरांवरील सौर ऊर्जा जोडणी पूर्ण झाली असून, त्यांना अद्याप मीटर रिलीज ऑर्डर मिळालेली नाही. ग्राहक आणि जोडणी करणारे व्यावसायिक दोन्ही बाजूंनी ऑर्डरची मागणी करत आहेत, परंतु विविध कारणे देत टाळाटाळ केली जात आहे. एका आमदाराचे स्वीय सहायक असलेल्या ग्राहकालाही अद्याप सोलर मीटर रिलीज ऑर्डर मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
