NEET पेपरफुटी प्रकरण:अमित देशमुखांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले- यात माझे नाव जोडणाऱ्यांचा हेतू शुद्ध नाही
![]()
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर, त्यांचे काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाषण करतानाचे आणि देशमुख कुटुंबीयांशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय टीका-टिप्पणी होत असून, या पेपरफुटीमुळे राज्यभरात नावाजलेला लातूर पॅटर्नही बदनाम होत असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आता लातूरचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच मौन सोडले असून, फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहित त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. याप्रकरणी सीबीआयचा तपास योग्य दिशेने सुरू असताना मी यावर टिप्पणी करावी, असे मला अजिबात वाटत नव्हते, असे स्पष्ट करत देशमुख यांनी या संपूर्ण घडामोडींवर सविस्तर भाष्य केले आहे. व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया अमित देशमुख म्हणाले, याप्रकरणी प्रारंभी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नीट पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले लातूर येथील एक निवृत्त प्राध्यापक आणि त्यानंतर एका शिकवणी क्लासचे मालक, आणि आपल्या पाल्यासाठी पेपर विकत घेणाऱ्यांनांही अटक झाली आहे. दुर्दैवाने त्या अटकेला अनेक जुने संदर्भ जोडण्याचे प्रयत्न काही मंडळींनी केले आहेत. त्यामुळे मी येथे स्पष्ट करू इच्छितो की, जे संदर्भ सामाजिक माध्यमांनी दिले आहेत ते सर्व तथ्यहीन आहेत. भूतकाळात एखाद्याने केलेल्या वक्तव्याचे वर्तमानकाळात संदर्भ जोडणे अजिबात शहाणपणाचे ठरत नाही. ज्यांनी संदर्भ जोडण्याचे प्रयत्न केले आहेत त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाही, असे म्हणत त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी संदर्भहीन वक्तव्य केली जात आहेत पुढे बोलताना अमित देशमुख म्हणाले, नीट पेपरफुटीत तपास यंत्रणांचे काम गतीने सुरू असताना आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट झालेले असताना, मी या संदर्भात टिप्पणी करावी असे मला अजिबात वाटत नव्हते; परंतु ज्या पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, या सरकारच्या काळातच पेपरफुटीचे असंख्य प्रकार घडत आहेत, लाखो विद्यार्थ्यांचे, सुशिक्षीत तरुणांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. अशा परिस्थितीत कोणत्या विषयावर बोलावे आणि न बोलावे याची परिपक्वता नसलेले सत्ताधारी पक्षाचेच उथळ पुढारी अशा संवेदनशील प्रसंगात राजकीय पोळी भाजण्यासाठी संदर्भहीन वक्तव्य करू लागले आहेत. खरे तर त्यांचीच वक्तव्ये आता संशयास्पद वाटावीत अशी माहिती पुढे येत आहे. दोषी मंडळींना नक्की शिक्षा होणार सध्याच्या परिस्थितीत सरकारी व्यवस्थेला त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करू देणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने तपास झाला तर सर्व तथ्ये बाहेर येणार आहेत, त्यावर पुढे न्यायव्यवस्था आहे, तेथे दोषी मंडळींना नक्की शिक्षा होणार आहे. तोपर्यंत धीर धरण्याचा शहाणपणा सर्वांनीच बाळगायला हवा, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
