पुणे पोलिसांकडून 'नो ड्रग्स व्हॉलेंटिअर' मोहिमेला गती:युवकांना स्वयंसेवक बनण्याचे आवाहन; शाळा-कॉलेजांत जनजागृती
![]()
पुणे पोलिसांनी शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या सेवनाला आळा घालण्यासाठी ‘नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ मोहिमेला गती दिली आहे. या मोहिमेत युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आझम कॅम्पस येथील असेंब्ली हॉलमध्ये आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. ‘नशामुक्त तरुणाई पुणे पोलिस स्वयंसेवक’ मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम पुणे पोलिस, लष्कर पोलिस ठाणे, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, अवामी महज आणि पद्मपाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमात सुमारे २०० ते २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकर, परिमंडळ ५ चे उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, तसेच लष्कर विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता अल्फान्सो, संतोष खेतमाळस उपस्थित होते. एम.सी.ई. सोसायटीच्या अध्यक्षा अबेदा इनामदार, ट्रस्टी आय.पी. इनामदार, पद्मपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल डंबाळे आणि डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठाचे पदाधिकारी व शिक्षकही उपस्थित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांचे वाढते सेवन ही पुणे शहरातील गंभीर समस्या असल्याचे नमूद केले. पोलिसांनी यापूर्वी अनेक कारवाया केल्या असल्या तरी जनजागृती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवकांना व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे कौटुंबिक नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ मोहिमेद्वारे शहरातील एक लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही मोहीम शाळा व महाविद्यालयांमध्येही राबविण्यात येणार असून, युवकांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात ड्रग्स शोध पथकाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
