पुण्यातील बाणेर-सूस येथील तीर्थ टॉवर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत आणि मुख्य प्रवेशद्वार पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पाडले. यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी भिंत २४ तासांत पुन्हा बांधण्याची, प्रवेशद्वार पूर्ववत बसवण्याची आणि कारवाईस जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून बडतर्फ करण्याची मागणी केली. ही कारवाई १६ ऑक्टोबर २०२६ रोजी झाली. सोसायटीला दिलेल्या नोटिशीत केवळ कमान पाडण्याचा उल्लेख होता. मात्र, कमानीपासून सुमारे २०० फूट दूर असलेली संरक्षक भिंतही पूर्वसूचना न देता पाडण्यात आली, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी केला. महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही ठोस कारवाई झाली नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, सचिव भरत पासी आणि कमिटी सदस्य प्रज्ञा वाघमारे यांनी रहिवाशांची भूमिका मांडली. संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार नसल्याने अनधिकृत प्रवेशाचा धोका वाढला आहे. चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी होण्याची भीती असल्याचे पासी म्हणाले. पुनर्बांधणी होईपर्यंत सोसायटी परिसरात नियमित पोलिस गस्त सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. भिंत नसल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात साप, डुकरे आणि भटकी कुत्रीही फिरत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. प्रशासनाने भिंत आणि प्रवेशद्वार तातडीने पूर्ववत करावे, अशी मागणी त्यांनी केली. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल केला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search