'लव्ह जिहाद' नंतर आता 'कॉर्पोरेट जिहाद':IT कंपन्यांत उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार, गोपीचंद पडळकर यांचा दावा
![]()
आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींवर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सध्या ‘लव्ह जिहाद’ सारखाच ‘कॉर्पोरेट जिहाद’ समोर आला आहे. त्यात आयटी कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत आहे. त्यामुळे मुलींनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणालेत. गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त खबळजनक आरोप केला. ते म्हणाले, नाशिक हे आयटी हब नसले तरी तिथे काही आयटी कंपन्या आहेत. पुणे हे मोठे आयटी हब आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही गैरप्रकार घडत असल्यास संबंधित कंपनी अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाशिक येथील एका कंपनीत एका तरुणाचा धर्मांतराचा प्रकारही समोर आला आहे. नाशिकच्या कंपनीचे दिले उदाहरण नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मुलींना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा दावाही पडळकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, सदर कंपनीत १३० कर्मचारी काम करतात. लैंगिक अत्याचारामुळे अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या. पण त्यातील नऊ पीडित मुलींनी धाडस दाखवून पुढे येत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. टीम लीडर्सना मुलींना जाळ्यात अडकवण्याचा टास्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने भोंदू अशोक खरात प्रकरण बाहेर आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आणखी एक प्रकरण शोधून काढले आहे. सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमली आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या संदर्भात टीम लीडर्सना टास्क ठरवून दिला जात असे. ते मुलींची मुलाखत घेऊन नोकरीसाठी शिफारस करत आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकत. नोकरी कोणी लावली हे सांगणे, सुट्टी देण्यासाठी दबाव टाकणे, तसेच विविध रिसॉर्टमध्ये सुट्टीच्या दिवशी फिरावयास घेऊन जाणे असे प्रकार घडत होते. इमॅजिका येथे कंपनीतील मुलींना फिरण्यास घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर तिघांनी नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
