उलटीचा बहाणा करत ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला:वानवडी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करत दागिने केले जप्त
![]()
पीएमपी बस प्रवासात उलटीचा बहाणा करून एका महिला प्रवाशाच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरात ही घटना घडली होती. ननिता दिनेश कांबळे (वय ३७, सध्या रा. विश्रांतवाडी, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला ३० मार्च रोजी हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्या वेळी शेजारी थांबलेल्या कांबळेने प्रवासात उलटी आल्याचा बहाणा केला. तक्रारदार महिलेचे लक्ष विचलित करून, तिच्या नकळत पिशवीतून सात लाख रुपयांचे दागिने चोरून नेले होते. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेनंतर वानवडी पोलिसांनी तपास सुरू केला. हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात एक महिला दागिने विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ननिता कांबळेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत ननिता कांबळेने पीएमपी बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विठ्ठल चोमले, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण आणि आशिष कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
