महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन मलिदा गँग:विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून साधला निशाणा
![]()
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झालेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात विलास लाड हा नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर तोंडसूख घेतले आहे. हिंदू खतरे मे है…, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल, असे ते म्हणाले. सत्ताधारी बोके भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न विजय वडेट्टीवार या प्रकरणी म्हणाले, “हिंदू खतरे मे है…, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे” असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल. आता पाहू काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड म्हणत आहे की, आपल्याला खूप मोठे काम मिळाले आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या कामांचे बजेट आहे. त्यातील काही निधी केंद्राने दिलाय तर काही राज्याने. अकाउंटला निधी येऊन पडलाय. या कामांचे टेंडर मॅनेज करण्यात आले आहे. मंत्र्यांपासून ते क्लर्क पर्यंत प्रत्येकाचे कमिशन ठरले आहे. त्यामध्ये माझ्या वाट्याला 500 कोटींच्या कामाचा कोटा आला आहे. आपण स्वतः 700 तंबू उभारण्याचे तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडर घेतले आहे. या कुंभमेळ्यामध्ये नाश्ता आणि जेवणाचे टेंडर 18 कोटी रुपयांचे आहे. ते देखील आपल्याला मिळाले आहे. कुंभमेळा फक्त 40 दिवसांचा आहे. त्यामुळे एवढा खर्च येत नाही. त्यामुळे त्यातून मोठे कमिशन मिळणार आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही मॅनेज करुन टेंडर देऊयात. फक्त कुणाला सांगू नको म्हणावे, असे विलास लाड फोनद्वारे समोरच्या व्यक्तीला म्हणताना या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
