बाहेरच्या उमेदवारांनी वाढवली सुनेत्रा पवारांची डोकेदुखी वाढली:53 पैकी केवळ 23 उमेदवार बारामतीतील; बाहेरील काही चर्चित नावे

0
730-x-548-new-2026-04-08t094334268_1775621604.jpg




बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. पूर्वीप्रमाणे निकाल निश्चित असल्याची भावना असली तरी यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याबाबत चर्चा सुरू होताच उलट उमेदवारांची संख्या वाढल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सध्या या मतदारसंघात 53 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. या 53 उमेदवारांपैकी जवळपास निम्मे उमेदवार बारामतीबाहेरील असल्याचे विशेष लक्षवेधी ठरले आहे. स्थानिक आणि बाहेरील उमेदवारांमुळे निवडणुकीची समीकरणे अधिक क्लिष्ट बनली आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या माघारीवर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे अवलंबून असले तरी इतर उमेदवारांचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळे बिनविरोधीची शक्यता अनिश्चिततेत अडकलेली दिसते. विशेष म्हणजे, बाहेरील उमेदवारांमध्ये काही चर्चित नावेही समोर आली आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरत निवडणुकीत रंग भरला आहे. या उमेदवारांना माघार घ्यायला राजी करणे हेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 55 जणांनी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर छाननी प्रक्रियेत दोन अर्ज बाद झाल्यामुळे अंतिम आकडा 53 वर आला. या 53 उमेदवारांमध्ये 23 उमेदवार हे बारामतीतील स्थानिक आहेत, तर उर्वरित 30 उमेदवार बाहेरील आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे शहर, दौंड, हवेली आणि इंदापूर या भागांमधून एकूण 27 उमेदवार आहेत. तर उर्वरित 26 उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिकच नव्हे तर राज्यभरातील राजकीय लक्ष वेधून घेत आहे. याआधी 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात उमेदवार होते. त्या वेळी 46 जणांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार अर्ज बाद झाले आणि नऊ जणांनी माघार घेतली. त्यामुळे अंतिमतः 23 उमेदवार रिंगणात राहिले होते. मात्र यावेळी सुरुवातीपासूनच उमेदवारांची संख्या जास्त असल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी होत चालल्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत सध्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत आहे. या मुदतीत किती उमेदवार माघार घेतात, यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात एकूण 3 लाख 83 हजार 767 मतदार असून, त्यांच्या मतांवरच अंतिम निकाल ठरणार आहे. त्यामुळे बारामतीची ही पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed