आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सोहम नेसनेसकरला सुवर्णपदक:विहिगावचा सोहम शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत
![]()
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहिगाव येथील सात वर्षीय सोहम मोहन नेसनेसकर याने व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र, आता त्याला पुढील दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सोहमने या स्पर्धेत जपान, मलेशिया आणि यजमान व्हिएतनामसारख्या देशांतील स्पर्धकांना मागे टाकून हे यश मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि सुवर्णपदकाचा समावेश होता. सध्या सोहम ओम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. त्याला भविष्यात उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यायचे आहे. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत मर्यादित असल्याने त्याच्या पालकांनी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. सोहमने वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाभ्यास सुरू केला. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याच यशाच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोहमचे वडील फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले असून, लकवाग्रस्त रुग्णांची मालिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत मर्यादित उत्पन्नातून ते घरखर्च सांभाळत सोहमच्या शिक्षणासाठीही बचत करत आहेत. व्हिएतनाम येथे स्पर्धेला जाण्यासाठी त्यांना सुमारे १ लाख ८० हजार रुपये खर्च आला होता. या खर्चापैकी कर्नाटक टीमने ५० हजार रुपये, तर काही सामाजिक संस्था, शाळा, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले होते. दर्यापूर येथील रोहिणी फाउंडेशनने ३० हजार रुपयांची मदत केली. उर्वरित रक्कम वडिलांनी जुळवली होती, परंतु वारंवार उद्भवणाऱ्या खर्चासाठी त्यांना अशी जुळवाजुळव करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोहमला आतापर्यंत ‘महाराष्ट्र गौरव’, ‘राष्ट्र गौरव’ आणि ‘क्रीडा शिरोमणी’सह एकूण १४ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला होता.
