मेळघाटमध्ये जलजीवन मिशन फसले:युवक काँग्रेसचा आरोप, भ्रष्टाचाराचा झाल्याचे सांगत स्वतंत्र चौकशीची मागणी
![]()
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासीबहुल मेळघाटमध्ये अनेक विकास कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र, युवक काँग्रेसने हे जलजीवन मिशन मेळघाटात पूर्णपणे फसल्याचा आरोप केला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या मते, ‘हर घर-नल से जल’ ही पंतप्रधानांच्या नावाने सुरू करण्यात आलेली योजना याठिकाणी सपशेल अयशस्वी ठरली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट आणि गरजधारी येथे पाणी वितरणासाठी एक ते दीड मीटर जलवाहिनी दाखवून त्यावर लाखो रुपये खर्च दर्शविण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात ती पाइपलाइन जमिनीवरच आहे; खोदकाम करून ती जमिनीत दाबण्यात आली नाही. याउलट, प्रत्येक गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून मोठी बिले काढली गेली. त्याचप्रमाणे, मेळघाटमधील जलजीवन मिशनमध्ये जुन्याच जलकुंभांना रंगरंगोटी करून मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची रक्कम हडप केली गेल्याचा आरोपही युवक काँग्रेसने केला आहे. अनेक ठिकाणी जुन्या टाक्यांची दुरुस्ती न करता केवळ रंगरंगोटी करून निधी लाटण्यात आला. चिखलदरा तालुक्यातील चिलाटी येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गतची जुनी टाकी २०१२-१३ मध्ये बांधली गेली होती. ती टाकी पूर्णपणे हलते आणि तिला गळतीही लागली आहे. तरीही, २०२२-२३ मध्ये त्या टाकीची रंगरंगोटी करून लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण, पाणीपुरवठा अजूनही बंदच आहे. सुमिता येथेही असाच प्रकार करण्यात आला असून, तेथील खर्चाची उचलही करण्यात आली आहे. सरवारखेडा येथे एका टाकीत एकही दिवस पाणी गेले नाही, तरीही दुसरी नवीन टाकी बांधली गेली. आता दोन्ही टाक्यांमध्ये एकही थेंब पाणी जमा झाले नाही. सद्यस्थितीत तेथील आदिवासी बांधवांना डोक्यावर घागर ठेवूनच पाणी आणावे लागते. रुईपठारला नवीन टाकी बांधली, त्यात डोमीवरून पाइपलाइन टाकून पाणी आणले, परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी नाही. लोक आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात आणि डोक्यावर पाणी आणावे लागते. कुहीला दोन टाक्या आहेत, तरी पाणीपुरवठा होत नाही. लोकांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. सिमोरी येथे टाकी बनविली, तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही. चोबिता आणि चुर्णीचा पाणीपुरवठाही बंद आहे. पीपल्या येथील पाणीपुरवठा बंद असून, नळाला पाणी येत नाही. कारादा येथेही हीच स्थिती आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठित करणे आवश्यक असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे.
