अवकाळीमुळे पिकांना फटका; हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या:क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
![]()
यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांची प्रचंड हानी झाली असून तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोमवारी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
.
गतवर्षी खरीपनंतर रब्बीमध्येही अवकाळी पाऊस झाला. मात्र पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामान्यांचा अंदाज होता. मार्च महिन्यात पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आला. अशाच काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्रच सुरू झाले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे. दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वर्षा मिना यांना निवेदन सादर केले. जिल्ह्यात ३० मार्च, ९ एप्रिल, ३ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारांमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, कांदा बियाणे, तीळ, उन्हाळी मूग, टरबूज, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून ती सरसकट घोषित करण्यात यावी; अन्यथा संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, मंगेश गावडे, रामहरी आगळे, रमेश चिचे, शेख मुख्तार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
गतवर्षी शेतमालाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पुढील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार २१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. १६३ गावांमधील ७ हजार ५७७ शेतकऱ्यांचे ६ कोटी ५ लाख ५६ हजारांचे नुकसान झाले होते. हा निधी मंजूर झाला. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका ७ हजार ३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता. ११ हजार ५९७ शेतकऱ्यांचे ६ कोटी २१ लाखांचे नुकसान झाले होते. या दोन्ही महिन्यांची मदत मंजूर झाली. ऑगस्ट महिन्यात १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला. मदतीसाठी ९२ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली. ही मागणीही मंजूर झाली. जिल्ह्यात यंदा सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी वाढीव क्षेत्राकरिता सर्वात शेवटी २३ कोटी ३७ लाख मंजूर झाले होते. याचा लाभ २१ हजार २९३ शेतकऱ्यांना मिळत आहे. ही वाढीव मदत २६ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रासाठी आहे. यापूर्वी १ लाख ७२ हजार ८७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १६२ कोटी ९५ लाख मंजूर झाले. राज्य शासनाने पीक नुकसान, पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जारी केले होते. यात जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा, महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदींचा समावेश होता. आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात केली आहे.
अवकाळी पावसामुळे १२२ हेक्टरवर नुकसान जिल्ह्यात २० मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने १२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. २.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. मंगळवार, ३१ मार्च रोजी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी ६५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. अर्थात ही आकडेवारी नजर अंदाजाच्या प्राथमिक पाहणीनंतर पुढे आली होती. तिसऱ्यांदा ३ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस पडल्याने २६८ हेक्टर क्षेत्रातील पिकं उद्ध्वस्त झाली.
