साताऱ्यात आजींना लुटणारा पुण्यातील 'इराणी' गजाआड:शिवाजीनगर पोलिसांनी पाटील इस्टेट परिसरातून केली अटक

0
01914451-360a-4da4-8936-a5fb63362e58_1775563770544.jpg




साताऱ्यात एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातील इराणी वस्तीतून ही कारवाई करण्यात आली आहे. इब्राहीम बाबू इराणी (रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साताऱ्यातील शाहूपुरी परिसरातील एका बँकेतून रोकड काढून बाहेर आलेल्या ज्येष्ठ महिलेला बतावणी करून इराणीने तिच्याकडील सात हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी साताऱ्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा आढळून आला होता, त्यानुसार सातारा पोलिस तपास करत होते. तपास पथकातील पोलिस कर्मचारी महेंद्र कडू यांना मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारा चोरटा पुण्यातील शिवाजीनगर भागातील इराणी वस्तीत राहत होता. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पाटील इस्टेट भागातील इराणी वस्तीतील त्याच्या राहत्या घरातून इराणीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साताऱ्यात ज्येष्ठ महिलेकडील रोकड चोरल्याचे कबूल केले. इराणी हा सराईत चोरटा असून, त्याने पुणे शहर, जिल्हा तसेच रायगड जिल्ह्यातही ज्येष्ठांची फसवणूक केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहायक आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, सचिन जाधव, महेंद्र कडू आणि रोहित झांबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed