अशोक खरात विरोधात 12 गुन्हे दाखल:एसआयटीकडून 9 गुन्ह्यांचा तपास सुरू, पीडितांची ओळख उघड करू नका – SIT प्रमुख तेजस्वी सातपुते
![]()
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) व्याप्ती वाढवण्यात आली असून, एकूण २४ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पथक अहोरात्र काम करत असल्याची माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी खरातच्या अघोरी कृत्यांचा पाढा वाचतानाच, पीडित महिलांच्या गोपनीयतेबाबत अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले. तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष तपास पथकामध्ये २ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक आणि ६ पोलीस अंमलदार अशा एकूण २४ जणांचा समावेश आहे. हे पथक तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे खरातच्या गुन्ह्यांचे जाळे उलगडत आहे. गुन्ह्यांचे स्वरूप आणि व्याप्ती अशोक खरात याच्यावर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ११ गुन्ह्यांचा तपास थेट एसआयटीमार्फत केला जात आहे. यामध्ये ८ गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे असून उर्वरित ३ गुन्हे आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अवैध सावकारी अधिनियमांतर्गत नोंदवण्यात आले आहेत. इतर तीन गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. अंधश्रद्धेचा आधार आणि दहशतीचा वापर तपासादरम्यान आतापर्यंत ३० पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. खरात हा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून भाविकांच्या आणि पीडितांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असे. “कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होईल” अशी भीती दाखवून, तसेच खडे, चिंचोके आणि रुद्राक्षाच्या माध्यमातून तो लोकांकडून पैसे उकळत होता. ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत हातचालाखीने चमत्कार दाखवणे आणि महिलांना बदनामीची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण करणे, असा त्याचा भयानक ‘मोडस ऑपरेंडी’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडितांची ओळख जपण्याचे कळकळीचे आवाहन पत्रकार परिषदेत तेजस्वी सातपुते यांनी समाजाला एक महत्त्वाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “महिला अत्याचाराच्यासंदर्भाने दाखल आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केल्यामुळे आपण कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. या महिलांनी लोक काय म्हणतील? या भीतीने अन्याय सहन केलेला आहे. आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्स मध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचे नैतिक कर्तव्य तर आहेच, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचे धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचे आहे, असे आवाहन तेजस्वी सातपुते यांनी केले. .”
