मांत्रिकाचा विवाहितेवर लैंगिक अत्याचार:हरवलेला पती परत आणण्याचे दाखवले आमिष; नातेवाईकांना बाहेर बसवले साधला डाव
![]()
नागपूरमध्ये हरवलेल्या पतीला परत आणण्याचे आमिष दाखवून एका मांत्रिकाने विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी ६५ वर्षीय आरोपी ताहीर रशीद बेग याला अटक केली आहे. आरोपीने आणखी किती महिलांना फसवले आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३६ वर्षांची असून घरकाम करून उदरनिर्वाह करते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिचा पती अचानक बेपत्ता झाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी ताहीर रशीद बेग याने स्वतःला मांत्रिक म्हणून सादर केले आणि तिचा विश्वास संपादन केला. एका कार्यक्रमात ओळख झाल्यानंतर आरोपीने जादूटोणा आणि विशेष पूजा करून तिचा पती परत आणू शकतो, असा दावा केला. सुरुवातीला काही विधी करून त्याने पीडितेचा विश्वास जिंकला. त्यानंतर ‘विशेष पूजा’च्या नावाखाली त्याने तिला एकांतात बोलावले. त्यावेळी आरोपीने तिच्या नातेवाईकांना बाहेर बसवून तिला धमकावले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तपासात असेही समोर आले आहे की, या घटनेनंतर आरोपीने पीडितेच्या घरी जाऊनही तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पीडितेने तक्रार दाखल करताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव परिसरातून अटक केली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, “पीडितेच्या तक्रारीनंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.”
