शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्याबांधापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत:माढ्यात शेती क्षेत्राला दिशा देणारे 25 शेतकऱ्यांचा पुरस्काराने सन्मानित
![]()
माढा शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांसह पंचायत समितीकडे मागणी करण्याबरोबरच शासनाच्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन माढा तालुका पंचायत समितीचे सभापती पंडित देशमुख यांनी केले. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापन दिनानिमित्त उपळाई खुर्द येथे भाजप किसान मोर्चा सोलापूर पश्चिम यांच्या वतीने आयोजित प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. या वेळी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. भाजप किसान मोर्चा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्या वतीने भाजप स्थापना दिनानिमित्त उपळाई खुर्द येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रास्ताविक करताना प्रकाश कुलकर्णी म्हणाले की,भाजप हा केवळ पक्ष नसून, देशहिताची चळवळ आहे. पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करणे ही प्रेरणादायी गोष्ट असून, अशा शेतकऱ्यांमुळेच कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळते. या वेळी प्रा. शिवाजीराव सावंत, शेतीतज्ञ मनोज शहा यांच्यासह शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रगतशील शेतकऱ्यांचा झाला पुरस्काराने सन्मान औदुंबर कोल्हे, मनमत गोटे, मंगेश देशमुख, विष्णू घाडगे, प्रकाश जाधव, विक्रम डोईफोडे, लक्ष्मण देशमुख, सुशेन ताटे, प्रशांत क्षीरसागर, संगीता सातपुते, रंजना शिंदे यांच्यासह एकूण २५ शेतकऱ्यांचा शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, वडशिंगचे सरपंच दत्तात्रय जाधव,माजी नगरसेवक अरविंद खरात, नंदकुमार मोरे, सतीश पाटील यांच्यासह सुमारे ३०० शेतकरी व महिला उपस्थित होते.
