केळकरांच्या समाधीचा पुन्हा गोठ्यासारखा वापर:डॉ. श्रीकांत केळकरांनी नाराजी व्यक्त केली; पुणेकरांनी मूळ स्वरूप जपण्याचे आवाहन
![]()
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामागे नदीपात्रात असलेल्या कै. गंगाधर केळकर यांच्या समाधीजवळ पुन्हा गुरे बांधून परिसराचा गोठ्यासारखा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. १९२८ साली बांधलेली ही समाधी वास्तू उभारणीचा एक अप्रतिम नमुना आहे. केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांना या समाधीचे मूळ रूप आणि भावना बदलू नये, असे आवाहन केले आहे. स्थानिक परिसरातील काही व्यक्ती समाधीच्या शेडमध्ये गुरे बांधून त्यांच्या चारा-पाण्याच्या सोयीसह वापर करत असल्याचे केळकर कुटुंबियांच्या निदर्शनास आले. हे पाहून गंगाधर केळकर यांचे नातू, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी समाधीला भेट देऊन पाहणी केली. गोठ्यासारखा वापर होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि महापालिकेने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. ही समाधी वास्तू केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुना आहे. ‘गंगाधर’ या शब्दाचा अर्थ शंकर असल्याने, उभारणीच्या वेळीच समाधीवर कलात्मकरित्या पिंड (शिवलिंग) बसवलेले आहे. पानशेतच्या पुरातून वाचलेली ही समाधी आजही येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही केळकर कुटुंबीयांकडे आहेत. त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन केले. यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये महाशिवरात्रीदरम्यान या समाधी स्थळाचे शिवमंदिरात रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे नंदीही बसवण्यात आला होता. डॉ. श्रीकांत केळकर यांनी आक्षेप घेतल्यावर तेथील अतिक्रमण संबंधितांनी स्वतःहून काढून टाकले होते, मात्र नंदी अजूनही आहे. जुलै २०२३ मध्येही समाधीजवळ गुरे बांधून परिसराचा गोठ्यासारखा वापर सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हाही केळकर कुटुंबीयांनी समाधी स्थळाचे रूपांतर करून मूळ रूप आणि भावना बदलू नये, असे आवाहन केले होते. या समाधीच्या संरक्षणासाठी केळकर कुटुंबीयांचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु त्यांना एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे फिरवले जात आहे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सर्व माध्यमातून जागृती घडवून आणल्यावर समाधीजवळील काही लोकांनी अनवधानाने उभारलेले फलक आणि लोखंडी काम स्वतःहून काढले होते. त्यानंतर केळकर कुटुंबीयांनी ‘कै. गंगाधर केळकर समाधीस्थळ’ असा फलक तेथे उभारला, ज्यामुळे या समाधीला तिची पूर्वीची ओळख परत मिळाली होती. पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते .समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही उपलब्ध आहेत. मात्र ,तेथे पुनः पुनः गोठा करण्याचे प्रयत्न होतच आहेत.नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले आहे .
