नांदेड गँगवॉरने पुन्हा हादरले:सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेना शहराध्यक्षाची भररस्त्यात हत्या; 3 दिवसांत तब्बल 5 मर्डर
![]()
नांदेड शहर सोमवारी आणखी एका हत्येने हादरले. आज पहाटे 5.30 च्या सुमारास मॉर्निंग वॉगसाठी गेलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची हल्लेखोरांनी भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. गत 3 दिवसांतील शहरातील हत्येची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे नांदेड पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमेतवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनू कल्याणकर (35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेनेचा शहराध्यक्ष होता. सोनू कल्याणकर सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाळीवर कुत्राही होता. यावेळी शहरातील श्रीनगर भागातील पंचशील कापड दुकानालगतच्या कुमार ड्रेसेस सोमर एका चारचाकीतून आलेल्या 6-7 हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड, चाकू व तलवारींच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला चढवला. हल्लेखोरांनी कल्याणकर यांची मान, पाठ व शरीराच्या विविध भागांवर वार करत त्यांना रक्तबंबाळ केले. या हल्ल्याची तीव्रता एवढी होती की, सोनू कल्याणकर जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी ते गतप्राण झाल्याचे पाहताच आपल्या वाहनातून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपासासाठी विशेष पथके तयार केली. या प्रकरणी एका संशयिताला तत्काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सोनू कल्याणकर यांच्यावर यापूर्वीही एकदा गोळीबार झाला होता. पण त्यात ते बचावले होते. पण यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा थेट जीव घेतला. झरी गावालगत 1 संशयित ताब्यात दुसरीकडे, पोलिसांनी सोनू कल्याणकर यांच्या हत्येनंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. त्यात एक संशयित शहरालगतच्या झरी गावालगत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तिकडे धाव घेतली असता संशयित पळून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याच्या पायावर गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर झरी परिसरातही काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत. शहरात 3 दिवसांत पाचवी हत्या दुसरीकडे, नांदेड शहरातील 3 दिवसांतील आजची पाचवी घटना आहे. 2 दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यात वर्चस्वाच्या वादातून सदा गंग व साई लाला गँगच्या पंटर्समध्ये राडा झाला होता. त्यात अरिजितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज व सय्यद आवेज यांचा खून झाला होता. त्यानंतर वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्लीत रज्जुसिंग तबेलेवाले यांची हत्या झाली होती. त्यानंतर आज पहाटे सोनू कल्याणकर यांची हत्या झाली. सातत्याने घडणाऱ्या या खुनांच्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाडस वाढल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व अगदी रुग्णालय परिसरातही हल्ले होत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
