धर्माचा बुरखा, अन् स्वार्थाचा कारभार! औंढा नागनाथमधील  जमीअतुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टचा २२.१६ लाखांचा देणगी घोटाळा एटीएसने उघडकीस आणला

[ads1]

कागदावर समाजसेवा, प्रत्यक्षात स्वतःचे उखळ पांढरे!

सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, हिंगोली येथे २० एप्रिल २०११ रोजी या ट्रस्टची नोंदणी (क्र. महा. ३१५/२०११ (एफ-४५८५)) करण्यात आली होती. कागदपत्रांवर शिक्षणाचा प्रसार करणे, रोगनिदान शिबिरे आयोजित करणे, शेती संवर्धन आणि नैसर्गिक आपत्तीत बाधितांना मदत करणे अशी मोठमोठी उदात्त उद्दिष्टे लिहून ठेवली होती. पण प्रत्यक्ष कारभारात मात्र या समाजसेवेच्या भाकड कथांचा वापर करून देणगीदारांच्या खिशावर दरोडा टाकला गेला.

कसला हिशोब अन् कसली कायदेशीर बाब?

या ट्रस्टच्या माध्यमातून गोळेगाव कॅम्प येथे जमीया अन्वर उल कुराण नावाची मदरसा चालवत नागरिकांकडून रोखीने तसेच क्यूआर कोडद्वारे देणग्या उकळल्या जात होत्या. कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता आणि कोणत्याही हिशोबाची तमा न बाळगता हिशोब कसला अन् कायदेशीर बाब काय असते?अशा मग्रूर थाटात हा गैरव्यवहार सुरू होता.

पण दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) नांदेड युनिटने या बेकायदेशीर कारभाराला चांगलाच चाप लावला आहे. एटीएसचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजीबखान नसीबखान पठाण यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी स्वतः या ठिकाणी जाऊन क्यूआर कोडद्वारे ५० रुपयांची देणगी फोन-पे वरून दिली (UTR: 384445806394) आणि पावती क्र. ११९० हस्तगत करून या टोळीच्या पापाचा घडा फोडला.

१२ वर्षांत २२.१६ लाखांवर मारला डल्ला

कॅनरा बँकेतील ट्रस्टच्या संयुक्त खात्यावर जमा होणारा देणगीचा पैसा संस्थेच्या मूळ हेतूसाठी खर्च करणे बंधनकारक होते. मात्र, २३ सप्टेंबर २०१४ ते २६ ऑगस्ट २०२६ या १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत ट्रस्टचा सचिव अलीमोद्दीन फय्याजोद्दीन इनामदार याने तब्बल २२ लाख १६ हजार रुपये परस्पर स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवून स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. याशिवाय रोखीने प्राप्त झालेल्या देणग्यांमध्येही मोठा अपहार करण्यात आला.

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चौघांच्या टोळीवर गुन्हा दाखल

या अपहारात केवळ सचिव एकटा नव्हता; तर अध्यक्ष नईम अहमद अब्दुल कादर अन्सारी, उपाध्यक्ष फय्याजोद्दीन बहोद्दीन इनामदार आणि कोषाध्यक्ष अंजुम कौसर अलीमोद्दीन यांनी पूर्ण संगनमत करून या दरोड्याला मोकळे रान करून दिले. एटीएस अधिकारी मुजीबखान पठाण यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८, ३१९ व ३1६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *