एसबीआयच्या वरिष्ठ लिपिकाकडून १६.३७ कोटींचा अपहार केल्याचा आरोप

[ads1]

शासकीय ठेवी व धनादेश वळवून खासगी खात्यांत रक्कम वर्ग केल्याची तक्रार; किनवट पोलिसांत गुन्हा दाखल

किनवट (प्रतिनिधी) –  स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या किनवट येथील शाखेत कार्यरत वरिष्ठ लिपिक तथा रोकडपालाने आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय निधी व मौल्यवान शासकीय रोख रकमेचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १ एप्रिल २०२४ ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल १६ कोटी ३७ लाख ६६ हजार ९१२ रुपयांची रक्कम परस्पर वळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवान उद्धवराव डवरे (वय ३९, रा. हिमायतनगर) हे एसबीआयच्या किनवट शाखेत वरिष्ठ लिपिक/रोकडपाल म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सार्वजनिक निधी तसेच मौल्यवान शासकीय रोख रकमेचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शासकीय बँक खात्यांमधून अधिकृत खात्यांवरून काढण्यात आलेली रक्कम तसेच २८० शासकीय धनादेश बँकेमार्फत वटवून त्यातील तब्बल १६,३७,६६,९१२ रुपये खासगी व्यक्ती, व्यावसायिक दुकाने तसेच अशासकीय खासगी घटकांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, रक्कम दडवून ठेवण्यासाठी जाणूनबुजून फेरफार करून फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रेमसिंग बाबूसिंग आडे (वय ५१, रा. सरस्वती विद्यामंदिर कॉलनी, किनवट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS)-२०२३ मधील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडळवार करीत आहेत. प्रकरणातील आर्थिक व्यवहार, शासकीय खात्यांमधून वळविण्यात आलेली रक्कम, संबंधित बँक खाती आणि व्यवहारांची कागदपत्रे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.


Post Views: 336










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *