[ads1]
जनसंवाद उपक्रमातून १६ तक्रारदारांशी साधला थेट संवाद; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना
परभणी (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडीअडचणी थेट जाणून घेऊन त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी येथे जिल्ह्यातील तक्रारदारांशी संवाद साधला.
पोलीस आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ व्हावा, नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी कार्यवाही करता यावी आणि पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने शाहजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये जनसंवाद हा उपक्रम सुरू केला आहे.
परभणी जिल्ह्याच्या कामगिरीचा मासिक आढावा घेण्यासाठी उमाप हे सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. याचदरम्यान दुपारी ३ ते ५ या वेळेत त्यांनी जिल्ह्यातील नागरिक व तक्रारदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी एकूण १६ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सादर केले.
प्राप्त तक्रारींमध्ये मालमत्ताविषयक वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, फसवणूक, कौटुंबिक वाद तसेच अवैध व्यवसायासंदर्भातील तक्रारींचा समावेश होता. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना श्री. उमाप यांनी सूचना दिल्या.
तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे जलदगतीने निराकरण व्हावे, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने यापूर्वीच ‘संवेदना’ तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ‘जनसंवाद’ उपक्रमादरम्यान प्राप्त झालेले सर्व अर्ज संवेदना पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत.
तसेच, संबंधित तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी केवळ स्वीकारल्या जाण्यापुरत्या मर्यादित न राहता त्यावर प्रत्यक्षात काय कार्यवाही झाली, यावरही देखरेख ठेवली जाणार आहे.यावेळी परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
[ads2]
















Leave a Reply