[ads1]
![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर गावात गेल्या दोन महिन्यांपासून जलवाहिनी फुटली आहे. यामुळे नालीतील घाण पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील मुख्य नालीमध्ये नळ योजनेचा पाईप लिकेज झाला आहे. नळ चालू असताना लिकेजमधून पाणी बाहेर येते आणि नळ बंद झाल्यावर त्याच पाईपमधून दूषित पाणी आत शिरते. दुसऱ्या दिवशी हेच दूषित पाणी नागरिकांना पुरवले जाते. यामुळे गावात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अनेकांना पोटदुखी आणि जुलाब यांसारखे आजार होत आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जुने कनेक्शन असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन कनेक्शन दिले. मात्र, जुने लिकेज असलेले कनेक्शन नालीमध्येच तसेच सोडून दिले. ते बंद करण्याची तसदी घेतली नाही. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनच गावाला दूषित पाणी पुरवत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भूषण खडसे, आकाश खडसे, अक्षय पुंड, अनिकेत तुमडाम, संजय मारबदे, अमोल थोरात, अमोल मारबदे, अतुल शेंडे, सागर जेठे, संकेत ठाकरे आणि संकेत भगत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तात्काळ लिकेज दुरुस्त करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. आकाश खडसे आणि अशोक गावंडे या दोन ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंचांना प्रत्यक्ष स्थळ दाखवून लिकेजबाबत कळवले होते. तरीही अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, यामुळे नागरिक अधिक नाराज झाले आहेत.
[ads2]
पहूर गावात जलवाहिनी फुटली, नालीतील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची भीती:दोन महिन्यांपासून समस्या, दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटाचे आजार; ग्रामस्थांची नाराजी
















Leave a Reply