हदगावात दोन दुकानांची कुलपे तोडून चोरी; रोख रकमेसह १ लाख ६० हजारांहून अधिकचा मुद्देमाल लांबविला

[ads1]

हदगाव (प्रतिनिधी) -हदगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुकानांची कुलपे व शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एकूण १ लाख ६० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी हदगाव व मनाठा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान हदगाव शहरात घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी राजू शिवाजी कदम (वय ४२, रा. कमलाई नगर, हदगाव) यांच्यासह अन्य आठ दुकानदारांच्या दुकानांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

राजू कदम यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७६/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३४(१), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

दरम्यान, दुसरी चोरीची घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री ७ ते २० सप्टेंबर रोजी पहाटे ४.१० वाजेदरम्यान मनाठा परिसरात घडली. मौ. बामणी फाटा ते हदगाव येथील फिर्यादीच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील ५२ हजार १०० रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

याप्रकरणी पांडुरंग बाबुराव ननेर (वय ३०, रा. चिंचगव्हाण, ता. हदगाव) यांच्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३४(१), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ भोपालकर करीत आहेत. हदगाव शहर व परिसरात दुकान फोडीच्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *