सातारा गुन्हेगारी वार्ता:दहीहंडीच्या जल्लोषात ध्वनिमर्यादा भंग; डीजेप्रकरणी दोघांवर कारवाई

[ads1]


दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याचे तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने स्टेज उभारल्याचे आढळून आल्याने शाहूपुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवार नाका परिसरातील या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. ५ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्यान बुधवार नाका येथे दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेल्या स्टेजमुळे पादचारी तसेच वाहनधारकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय ऊर्फ ऋतिक विनोद कांबळे (२६) आणि अनिकेत महेंद्र रावळ (२४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप दोघांवर आहे. दोघांना बीएनएस कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हवालदार इंगळे करीत आहेत. कुलपाचा वाद पेटला; खणआळीत दोन गटांत मारामारी शटरचे कुलूप काढण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळून शुक्रवार पेठेतील खणआळी परिसरात दोन गट आमनेसामने आले. या झटापटीत लोखंडी रॉड आणि हातोड्याचा वापर झाल्याचे दोन्ही बाजूंच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एका व्यक्तीला ग्राइंडरमुळे दुखापत झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
तुषार हरी कासट यांच्या तक्रारीनुसार, दुकानासमोरील दरवाजाचे कुलूप काढण्यास सांगितल्यावर वादाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्यासह भांडण सोडविण्यासाठी आलेल्या भावाला व अन्य व्यक्तींना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोखंडी रॉडने डोक्यात आणि पाठीवर मारल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूने नरेश गोविंद अच्युताणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बंद दुकानाचे कुलूप हातोडी व कटरच्या साहाय्याने तोडले जात असल्याबाबत विचारणा केली असता त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण झाल्याचे, तर एका अनोळखी व्यक्तीने ग्राइंडरच्या साहाय्याने दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल झाले असून, पुढील तपास पोलिस हवालदार भोसले व मोहिते करीत आहेत. महिलेचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा आरोप; संशयितावर गुन्हा किराणा दुकानात आलेल्या व्यक्तीने महिलेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार सातारा तालुक्यातील एका गावात करण्यात आली आहे. महिलेच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला असून, या प्रकरणी शकील निजाम फरास (रा. नेले फरासवाडी) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संशयित किराणा दुकानात आला होता. त्यावेळी त्याने महिलेचा हात पकडला. तसेच तिच्याशी प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि खांद्याला हात लावून अश्लील नजरेने पाहत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *