नांदेडमध्ये टॅक्सी बुकिंगच्या नावाखाली तरुणाची १ लाख ६५ हजारांची ऑनलाइन फसवणूक

[ads1]

नांदेड (प्रतिनिधी) – सिंधी कॉलनी येथील २५ वर्षीय तरुणाची टॅक्सी बुक करण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी १ लाख ६५ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

फिर्यादी कुंदन केलास बन (वय २५, रा. सिंधी कॉलनी, नांदेड) यांनी दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई ते नाशिक टॅक्सी बुक करण्यासाठी ‘शाम कार रेटल’ या ऑनलाइन वेबसाइटवर सर्च केले. त्यावरून तेथील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेतल्यानंतर १४९ रुपयांचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी एक्सीस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला. मात्र, पेमेंट करताना ओटीपी न आल्याने त्यांनी बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डने पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पेमेंट होत नसल्याचे सांगून भामट्यांनी फिर्यादीस एक लिंक पाठवली व ती उघडण्यास सांगितले. फिर्यादीने ती लिंक उघडताच त्यांच्या बँक ऑफ बडोदा व एक्सीस बँक या दोन्ही क्रेडिट कार्डमधून एकूण १ लाख ६५ हजार ८०० रुपयांची विनाविलंब कपात करण्यात आली.या प्रकाराने फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३६/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम फसवणुकीच्या गुन्ह्याशी संबंधित असून जुन्या कलम ४२० (IPC) च्या समतुल्य आहे. या कलमांतर्गत दोषी आढळल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरनर हे करीत आहेत.

सायबर फसवणुकीपासून सावधान राहा –  कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक उघडू नका, बँकिंग तपशील किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका व अशा प्रकारची फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा.


Post Views: 342






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *