[ads1]
पोलिसांची सिंघम स्टाईल हवेत विरली!
त्या रविवारी, म्हणजे ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०५ वाजता चिखली फाट्यापाशी जो हाईव्होल्टेज ड्रामा घडला, तो आठवला की हसूही येते आणि पोलिसांची कीवही येते. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याच्या बाजार हातनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गोकला हे आपल्या सहकाऱ्यांसह अगदी छाती फुगवून, फरार आरोपी शेख बकर याला चिखलीतून ताब्यात घेऊन चालले होते. जणू काही फार मोठे जग जिंकून निघाले होते! पण चिखली फाट्यापासून अवघ्या १ किलोमीटर अलीकडे त्यांचा हा सगळा दिमाख हवेत विरला. आरोपीचा भाऊ शेख सोनू आणि त्याच्या ५० ते ६० महिला-पुरुषांच्या पराक्रमी जमावाने हातात लाठ्या-काठ्या आणि दगड घेऊन पोलिसांची वाट अडवली.
संतप्त जमावाचा हा रौद्र अवतार पाहून पोलीस पथकाची इतकी घाबरगुंडी उडाली की त्यांनी तिथूनच यू-टर्न घेऊन किनवटच्या दिशेने पळ काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण जमावही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता! त्यांनी गाडीचा पाठलाग करून ती अडवली. जमावाने जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि पोलीस उपनिरीक्षक गोकला यांच्या डोक्यात काठीने सणसणीत प्रसाद दिला. बिचारे इतर पोलीस कर्मचारीही तोंडावर, पाठीवर, छातीवर आणि डोक्यावर जमावाच्या लाथाबुक्क्यांचा आस्वाद घेत होते. हल्ला इतका जोरदार होता की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांना अखेर आपल्या सर्व्हिस पिस्तूलची आठवण आली आणि त्यांनी हवेत एक गोळी झाडली (फायर केला). पण तोपर्यंत उशीर झाला होता; जमावाने पोलिसांना चांगलाच ‘धडा’ शिकवून त्यांच्या ताब्यातून मुख्य आरोपी शेख बकर याला बळजबरीने सोडवून पळवून नेले होते.
उशिरा का होईना, कायद्याला जाग आली!
या मानहानीकारक मारहाण नाट्यानंतर, पोलीस प्रशासनाने ३१ ऑगस्ट रोजी पहाटे २:१५ वाजता किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. र. नं. २२४/२०२६) दाखल करण्याचे शौर्य दाखवले. पोलीस उपनिरीक्षक रमेश गोकला यांच्या फिर्यादीवरून शेख बकर, शेख सोनू आणि इतर ५० ते ६० अज्ञात लोकांवर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन,भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम, किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मुख्य आरोपीसह दोन हल्लेखोर गजाआड!
देर आये, दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे पोलिसांनी अखेर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी चपळाईने हालचाली करत, पळवून नेलेल्या त्या मुख्य आरोपीला (शेख बकर) पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, पोलिसांवर हात उचलून मर्दुमकी गाजवू पाहणाऱ्या त्या जमावातील दोन मुख्य हल्लेखोरांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता पाहूया की, पोलीस ठाण्यात कुलूप लावण्याची हिंमत दाखवणारे उरलेले ५०-६० शूरवीर आणखी किती दिवस पोलिसांना हुलकावणी देतात, की लवकरच तेही आपल्या या तीन मित्रांच्या संगतीला जेलची डाळ-चपाती खायला दाखल होतात! चिखली येथील शेख जाफर उर्फ बाखर शेख आदम याला दिनांक 03/09/2026 रोजी पर्यंत PCR मिळाला आहे.
संबंधित व्हिडीओ ..
[ads2]
















Leave a Reply