[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) -कायदा आणि खेळ या दोन्ही क्षेत्रांची उत्कृष्ट सांगड घालून कायद्यानुसार खेळाची अंमलबजावणी केल्यास शिस्तप्रिय, सक्षम आणि सर्वोत्कृष्ट समाज घडण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय तायक्वाँदो प्रशिक्षक तथा महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत क्रीडा पुरस्काराचे मानकरी मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात २९ ऑगस्ट रोजी आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन व्याख्यानमालेत ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. विना पाटील होत्या. यावेळी प्रा. डॉ. विकास खाकरे तसेच आयोजक व क्रीडा संचालक डॉ. चरणजीतसिंग महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मास्टर बालाजी पाटील जोगदंड आणि प्राचार्या डॉ. सौ. विना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना जोगदंड यांनी समाजव्यवस्थेत कायदा आणि खेळ यांची भूमिका स्पष्ट केली. खेळामध्ये शिस्त, नियमांचे पालन, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि संघभावना विकसित होते. याच मूल्यांचा उपयोग कायद्याच्या क्षेत्रातही होतो, असे त्यांनी सांगितले. शासनाकडून खेळाडूंना दिले जाणारे विविध पुरस्कार, रोख बक्षिसे तसेच शासकीय नोकरीतील संधी याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी त्यांनी खेळातील महिलांचे स्थान, खेळातून देशसेवा आणि खेळाडू म्हणून उपलब्ध होणाऱ्या संधी यावरही मार्गदर्शन केले. मेजर ध्यानचंद यांनी सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात बजावलेली भूमिका, तसेच देशप्रेमाची भावना जपत त्यांनी परदेशातील आकर्षक संधी नाकारल्याचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विना पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. अभ्यासाबरोबरच नियमित खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते, तसेच व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. चरणजीतसिंग महाजन यांनी केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. राजीव वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती मेका यांनी मानले.
यावेळी विधी महाविद्यालयातील कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना कायदा, क्रीडा, शिस्त आणि राष्ट्रसेवा यांचा सुंदर समन्वय समजून घेण्याची प्रेरणा मिळाली.

Post Views: 306
[ads2]
















Leave a Reply