असहकार आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला जाग:तीनवर्षापुर्वी पासूनचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

[ads1]


हिंगोली जिल्हयात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने आता तीन वर्षापुर्वीपासूनच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठीचे प्रस्ताव मागविले आहेत. हिंगोली जिल्हयात ५६३ ग्रामपंचायती असून सुमारे ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हयात उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. मात्र जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या दुर्लक्षामुळे मागील तीन वर्षापासून प्रस्तावही मागविले नाही अन पुरस्कारही दिले नाही. या प्रकारामुळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतून तिव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यकार्यकारी अधिकारी केशव गड्डापोट यांच्याकडे निवेदन दिले आहे. मात्र प्रत्येक वेळी संघटनेला आश्‍वासनेची मिळाली आहेत. दरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ता. २० ऑगस्टपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. या मागण्यांमध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची निवड करून पुरस्कार वितरणाची मागणी देखील आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने तातडीने पाचही पंचायत समितींना पत्र पाठवून सन २०२२-२३ पासून ते आज पर्यंतचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवून सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रस्तावांची तपासणी करून स्पष्ट गुणांकनासह प्रस्ताव दोन प्रतींमध्ये सादर करणे, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयीन प्रकरण किंवा विभागीय चौकशी सुरू नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, पोलीस अधीक्षकांचे चालू कालावधीतील चारित्र्य प्रमाणपत्र, वर्तणूक प्रमाणपत्र आणि एक ते तेहतीस अभिलेखे अद्ययावत ठेवल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, उशीरा का होईना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आल्याने संघटनेतून समाधान व्यक्त होत असून आता ता. २ ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरीत करून कौतूकाची थाप पडणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात उपमुख्यकार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे मागील तीन वर्षापासून प्रस्ताव का मागविले नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *