[ads1]
![]()
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित आहे. फेब्रुवारीमध्ये मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप निकाल जाहीर न झाल्याने स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांमधील शिक्षक आणि व्यवस्थापनामध्ये नाराजी आहे. शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा उंचावण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. मात्र, निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्याने बक्षीसे कधी मिळतील, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. या दिरंगाईमुळे शाळांच्या पुढील शैक्षणिक नियोजनावरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. शहर आणि ग्रामीण भागातील तालुका, जिल्हा, महानगरपालिका आणि विभाग स्तरावर एकूण २,६१० शाळांना पुरस्कार दिले जातात. यामध्ये राज्यस्तरावर निवडल्या जाणाऱ्या सहा शाळांचाही समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील सुमारे तीन डझनहून अधिक शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेसाठी शाळांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासोबतच भौतिक सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनाने यासाठी मेहनत घेतली होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे निकाल तातडीने जाहीर करून पात्र शाळांना नियमानुसार पुरस्काराची रक्कम वितरित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या निकालाला विलंब होण्यामागे ७२.२२ कोटी रुपयांच्या बक्षीसांची रक्कम वाचवण्याचा शासनाचा डाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शाळांकडून मोठ्या अपेक्षा निर्माण करून घेतल्यानंतर आता त्यांना पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.
[ads2]
मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेचा निकाल रखडला:7 महिन्यांपासून प्रलंबित, शिक्षकांचा हिरमोड, बक्षीसांची प्रतीक्षा
















Leave a Reply