अमरावतीत कचरा समस्या कायम, नवी कंपनीही अपयशी:जुन्या कंपन्या रद्द करून 'कोणार्क'ला कंत्राट देऊनही स्थिती जैसे थे
![]()
अमरावती शहरातील कचरा समस्या अजूनही कायम आहे. पूर्वी तीन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत शहराचा कचरा संकलित करून कंपोस्ट डेपोवर पाठवला जात होता. आता त्या तिन्ही कंपन्यांचे कंत्राट रद्द करून ‘कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर’ या नव्या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे, तरीही शहरातील कचरा व्यवस्थापनाची स्थिती ‘जैसे थे’च आहे. ‘कोणार्क’ला कंत्राट देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम केंद्रीकृत करण्यात आले आहे. शहरातील पाचही झोनच्या स्वच्छतेसाठी ही एकमेव कंपनी जबाबदार आहे. कंत्राटानुसार, कंपनीने जुन्याच यंत्रणेचा वापर करून तीन महिन्यांत स्वतःची ‘फुल प्रुफ’ यंत्रणा तयार करणे अपेक्षित होते. स्वच्छतेचे कामही टप्प्याटप्प्याने देण्यात आले होते. मात्र, कामाचा पहिला टप्पा सुरू होऊन जवळपास पाच महिने उलटले तरी कंपनीला स्वतःची अपेक्षित यंत्रणा तयार करता आलेली नाही. यामुळे गेल्या महिन्यात झालेली विशेष सभा तसेच त्यापूर्वीची व त्यानंतरची आमसभा याच मुद्द्यावर गाजली. नगरसेवकांनी कंपनीच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभागृहात प्रभावी असलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी तर हा ठेका रद्द करण्यासाठी आंदोलनही केले. असे असूनही, कामात अद्याप कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. मनपाने जारी केलेल्या ॲपवर दररोज कचरा संदर्भात तक्रारी नोंदवल्या जातात, परंतु परिस्थितीत बदल होताना दिसत नाही. याव्यतिरिक्त, शहरात पथदिव्यांच्या व्यवस्थापनातही त्रुटी आढळत आहेत. विद्युत खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने रात्री अनेक परिसरात पथदिवे बंद ठेवले जातात, तर काही भागांत दिवसाही पथदिवे सुरू असतात. जुन्या अमरावतीसह अनेक नव्या परिसरात रात्री पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत. विशेषतः वादळी पावसाच्या दिवसांत ही समस्या अधिक गंभीर होते. शहरातील अंतर्गत व काही बाह्य रस्त्यांवर खड्डे आणि चिखल असल्याने, रात्री पथदिवे बंद असल्यामुळे वाहने घसरून किंवा खड्ड्यातून उसळून अपघात होत आहेत. यामुळे मनपा प्रशासनासह महावितरणविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे.
